26 February 2020

News Flash

२३. ‘वैखरी’चा पाया!

मनात रामाचं चिंतन करावं आणि मग वैखरीनं त्याचा जप करावा’, असा प्रचलित आहे.

शाश्वताचं, ‘रामा’चं चिंतन, स्मरण स्थिरावू लागल्यावरचा पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे, ‘‘पुढे वैखरी राम आधी वदावा!!’’ या चरणाचा साधारण अर्थ, ‘मनात रामाचं चिंतन करावं आणि मग वैखरीनं त्याचा जप करावा’, असा प्रचलित आहे. प्रत्यक्षात याचा गूढार्थ फार विराट आहे. तो आता पाहू. प्रभाते मनी राम चिंतीत जावा। म्हणजे साधक जीवनाच्या प्रारंभिक काळात मनात शाश्वताचं चिंतन करावं, शाश्वत परमात्म्याचं चिंतन करावं, हा झाला. आता पुढे जे समर्थ सांगतात ते फार मार्मिक आहे. समर्थ म्हणतात, ‘‘पुढे वैखरी राम आधी वदावा।। ’’ पुढे म्हणजे डोळ्यांपुढे, ‘वैखरी’ म्हणजे व्यक्त जग, ‘आधी’ म्हणजे पाया! तर डोळ्यांपुढे पसरलेलं जे व्यक्त जग आहे ना त्याचा पाया रामच आहे, तो शाश्वत परमात्माच आहे, हे लक्षात ठेवावं! कारण, प्रभाते मनी राम चिंतीत जावा, हे एकवेळ साधू लागेल, पण एकदा का जगात वावर सुरू झाला की अंतर्मनातलं ते चिंतन क्षणार्धात ओसरण्याचा मोठा धोका असतो! साधकाची वाटचाल जणू निसरडय़ा कडय़ावरूनच सुरू असते. कधी दृश्यात फसगत होईल, कधी आत्मघात होईल, काही सांगता येत नाही. समर्थानीच म्हटलं आहे ना? ‘‘अंतरनिष्ठ तितुके तरले। अंतरभ्रष्ट तितुके बुडाले। बाह्य़ाकारें भरंगळले। लोकाचारें।।’’ (दासबोध, दशक १८, समास पहिला). अंतर्मनात रामचिंतनाचा जो आधार आहे तो कायम दृढ राहिला तर असा अंतरनिष्ठ साधक भवसागर तरून जातो. ज्याची ही धारणा सुटते, असा अंतरभ्रष्ट साधक भवसागरातच गटांगळ्या खात बुडून जातो. ‘‘बाह्य़ाकारें भरंगळले। लोकाचारें।।’’ यातले तिन्ही शब्द फार अर्थगर्भ आहेत. जो अंतरभ्रष्ट आहे तो बाह्य़ाकारात म्हणजे अनंत आकारांत साकारलेल्या विकारवश जगाच्या विकारमय रीतीत, लोकाचारात, वेडाचारात भरंगळून जातो! घसरत जातो.. तर अंतर्मनात रामाचं चिंतन करू लागलो, पण बाह्य़ जाणिवेची दृष्टी उघडताच जे जग दिसतं त्याच्या बाह्य़ाकारातच गुरफटलो तर अंतरभ्रष्ट व्हायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. अंतरभ्रष्ट झालो तर भवसागरात गटांगळ्या खात बुडावंच लागेल. आता हा ‘भवसागर’ शब्दसुद्धा फार सूचक आहे. प्रत्यक्षात असा भवसागर कुठे दिसतो का हो? तर हा भवसागर म्हणजे भावविवशतेचा अथांग सागर आहे! भ्रम, मोह, विकारशरण होऊन अशाश्वतातलं आपलं जे गुंतणं आहे त्याचा परिघ क्षणोक्षणी विस्तारत आहे. हाच जणू विराट, अथांग असा भवसागर आहे. या भव-तालावर नाचण्यातच अनंत जन्म सरत आहेत. याच भवसागरात गटांगळ्या खात आपण बुडतो आणि परत याच भवसागरात जन्म घेत डुंबत राहातो. प्रत्येक वेळी नवं रूप लाभतं, नवी परिस्थिती लाभते, नवी माणसं लाभतात. अंतर्मनातला वासनापुंज मात्र तसाच असतो. त्याच भावना, त्याच वासना, त्याच कामना. त्या अशाश्वत, भ्रामक कामनापूर्तीसाठीची तीच ओढ, तीच तळमळ, तीच धडपड. मग हा भवसागर पार होणार तरी कसा? तो पार व्हायला हवा असेल तर आधी अशाश्वतात भावनेनं जे गुंतणं आहे ते कमी व्हायला हवं. भावनाही शुद्ध व्हायला हवी. ‘भाव तोचि देव’ म्हणतात ना? जसा भाव असतो तशी कृती होते आणि मग ती कृतीच तिच्याअनुरूप भोग आपल्या वाटय़ाला देते, हा त्याचा अर्थ. तेव्हा भाव शुद्ध झाला तर भवसागर हा मृगजळवत् होईल. मग तो ‘पार करण्या’चे कष्टही उरणार नाहीत. तेव्हा हे जे दृश्य जग आहे ते मिथ्या म्हणजे सदोदित बदलतं आहेच, नश्वर, अशाश्वत आहेच, पण हे जगही त्याच शाश्वत परमात्म्याच्या आधारावर उभं आहे! झाडं नष्ट होतं, पण बीजाला अंत नाही! तसं दृश्य-अदृश्य आणि दृश्यातीत चराचराचं परमबीज असलेल्या परमात्म्याचं अखंड भान म्हणजे ‘‘पुढे वैखरी राम आधी वदावा!!’’
-चैतन्य प्रेम

First Published on February 3, 2016 12:05 am

Web Title: mind meditation
टॅग God
Next Stories
1 २२. प्रभाते मनी राम चिंतीत जावा
2 २१. अंधार अन् उजेड..
3 २०. सज्जनांचा भक्तीपंथ..
Just Now!
X