सूर्य उगवतो तेव्हा त्याचा लाभ चराचरातल्या प्रत्येकाला होतो. जीवनधारणेसाठी आवश्यक ऊर्जा मिळतेच शिवाय पाणी ,अन्नधान्य या देहधारणेसाठी अनिवार्य गोष्टीही त्याच्याच अस्तित्वानं अखंड सहजप्राप्य होतात. सूर्य एकच असतो. त्याची ऊर्जाही सर्वाना सारखीच, तरी त्या ऊर्जेचा लाभ जो तो आपापल्या पात्रतेनुसार, क्षमतेनुसार, आकलनानुसार घेतो. तसा सद्गुरू सर्व मानवमात्रांच्या कल्याणासाठी प्रकटला असला तरी त्याचा खरा लाभ जो तो आपापल्या पात्रतेनुसार आणि आकलनानुसार घेत असतो. त्यांचं वावरणं, वागणं आणि बोलणं यांचा परिणाम लगेच जाणवला नाही तरी कालांतरानं तो जाणवू लागतोच. जसं बीज जमिनीत पडताच झाड उगवत नाही! तसं त्यांच्या शब्द आणि कृतीचं जे बीज अंत:करणात पडतं ते कधी ना कधी अंकुरल्याशिवाय राहात नाही. माणसाच्या अंत:करणात पालट घडविणं, माणसाला आधी चांगला माणूस म्हणून कसं जगावं हे शिकवणं आणि मग त्याला साधनेच्या मार्गावर चालवणं, हाच सद्गुरू लीलेमागचा मूळ हेतू असतो. अनेकानेक सद्गुरू चरित्रात त्याचा दाखला आपल्याला पडताळून पाहता येईल. तेव्हा आपल्या माणसांसाठी सद्गुरू प्रकटला असला तरी तो ज्यांच्याज्यांच्या संपर्कात येतो त्या प्रत्येकाला काही ना काही आंतरिक लाभ झाल्याशिवाय राहत नाही. पण समर्थ सांगतात, ‘‘तया नेणती ते जन पापरूपी। दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी।।’’ जे सद्गुरूंना जाणत नाहीत त्यांच्यावर कठोर प्रहार समर्थ करीत आहेत. मग मघाशी तर म्हटलं की, त्यांना जे जाणत नाहीत त्यांनाही लाभ झाल्याशिवाय राहत नाही. मग हे ‘नेणते’, त्यांना न जाणणारे म्हणजे कोण? तर त्यांच्या संपर्कात अध्यात्माचे निमित्त करून जे येतात, ज्यांना त्यांचं खरं महत्त्व, खरा हेतू, खरं जीवनध्येय माहीत असतं तरीही जे आपल्या स्वार्थाच्या ओढीला त्यांच्या बोधापेक्षा अधिक मोल देतात त्यांना समर्थानी इथं पापरूपी, दुरात्मा, महानष्ट वगैरे म्हटलं आहे. आता पापरूप म्हणजे काय? गोंदवलेकर महाराज सांगत की, ‘‘भगवंताचं विस्मरण हेच सर्वात मोठं पाप आहे.’’ म्हणजे तरी काय हो? हे समजण्यासाठी भगवंताचं स्मरण म्हणजे काय, ते आधी समजलं पाहिजे. समजा मूल आजारी आहे आणि तरी एका कौटुंबिक समारंभात आईला जावंच लागलं आहे, तरी तिच्या मनाची सगळी ओढ घरीच असेल. अगदी त्याचप्रमाणे जगात वावरत असतानाही त्या परम तत्त्वाचं विस्मरणच झालं नाही तर मग संकुचित गोष्टींमध्ये मन गुंतणारच नाही. लैंगिक ओढ आणि पैशाची ओढ; या दोन ओढी माणसाला चुकीच्या मार्गाला नेऊ शकतात, त्याच्या अध:पाताला कारणीभूत होतात. जर ओढ परम तत्त्वाचीच असेल, स्मरण परम तत्त्वाचंच असेल, तर संकुचित गोष्टींत माणूस फसणारच नाही. इथं लैंगिकता वा पैशाला गैर ठरवलेलं नाही, हे लक्षात घ्या. पण जी कोणतीही गोष्ट जीवनाच्या मुख्य उद्दिष्टापासूनच खाली खेचते तिचा साधकबाधक विचार केलाच पाहिजे. तेव्हा भगवंताचं स्मरण म्हणजे आपल्या परम ध्येयाचं स्मरण आहे. त्या स्मरणात वाटचाल करीत असताना लौकिक जीवनाचा त्याग करायचा नाही. ते नेटकं जगण्याचा प्रयत्न करायचाच आहे. नीतिधर्माच्या चौकटीत किंवा दुसऱ्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचं भान राखत भौतिक आणि शारीरिक सुखासाठीही प्रयत्न करायचे आहेत, पण त्याच जोडीला या सर्व गोष्टी अस्थिर, अनिश्चित, अशाश्वत आहेत हे अनुभवानं कळल्यावर तरी त्यात मनानं न अडकण्याचा अभ्यासही करायचा आहे. या अभ्यासाचीच दुसरी बाजू म्हणजे परम तत्त्वाचं अर्थात परमात्मा वा सद्गुरूंचं स्मरण आहे. हे स्मरण कुणा व्यक्तिरूपाचं स्मरण नाही. ते विचाररूपाचं स्मरण आहे. ते बोधाच्या आचरणाचं स्मरण आहे. ज्याचं हे भान सुटतं तो संकुचितातच अडकतो. मग परम ध्येयाच्या विस्मरणाचं पाप त्याच्याकडून घडतं.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2017 रोजी प्रकाशित
४१७. पाप
सूर्य उगवतो तेव्हा त्याचा लाभ चराचरातल्या प्रत्येकाला होतो.
Written by चैतन्य प्रेम
First published on: 24-08-2017 at 02:53 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy