लातूर : एप्रिल महिन्यातील करोनाचा उद्रेक इतका प्रचंड झाला की, गतवर्षी मार्च महिन्यापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत झालेल्या एकूण करोनाबाधितांपेक्षा एप्रिल २०२१ या एका महिन्यातील करोनाबाधितांची संख्या अधिक आहे.

मार्च २०२० मध्ये करोनाच्या पाश्र्वभूमीवर देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली. एप्रिल २० मध्ये जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या १६, मे-११९, जून-२१४, जुलै-१ हजार ८५१, ऑगस्ट-५ हजार ९११, सप्टेंबर-९ हजार १८८, ऑक्टोबर-३ हजार २२, नोव्हेंबर-१ हजार ५५०, डिसेंबर-१ हजार १५०, जानेवारी २०२१-१ हजार ९९५, फेब्रुवारी-१ हजार १७५, मार्च-८ हजार ५६ अशी एकूण ३३ हजार ४७७ संख्या आहे तर केवळ एप्रिल २०२१ या एका महिन्यातील करोनाबाधितांची संख्या ३७ हजार ६२८ इतकी आहे. वर्षभरातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा तब्बल चार हजाराने हा आकडा अधिक आहे.

मे महिन्यातील करोनाबाधितांचा आकडा दररोज हजारापेक्षा अधिक आहे. २ मे रोजी जिल्ह्य़ात नव्याने ११२६ रुग्णांची भर पडली तर १२४७ जण रुग्ण बरे होऊन घरी परत गेले व दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत करोनाबाधितांचा एकूण आकडा ७३ हजार ४५५ वर पोहोचला असून यातील ५९ हजार ८५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १२ हजार २७५ रुग्ण उपचार घेत आहेत.

सध्या ८५८ रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यापैकी ७४ जण मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर असून ३२८ जण बीआयपीपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत, तर १९७५ रुग्ण प्राणवायूवर आहेत. आठ हजार ४९ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचे प्रमाण अजूनही तपासणीच्या १६ टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. राज्यभरातील करोनाबाधितांमध्ये लातूर जिल्ह्य़ाचा क्रमांक सातवा आहे. तो गेल्या महिन्याभरापासून टिकून आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने वाढत आहे. मात्र, प्राणवायूवर असलेल्या रुग्णांची संख्या मात्र अद्याप वाढतेच आहे.

गेल्या महिन्याभरात मृत्यूचा आकडा ५०० पेक्षा अधिक आहे. मृत्युदर कमी करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्य़ात टाळेबंदी आहे. दिवसाला दोन हजारांपेक्षा पोहोचलेला करोनाबाधितांचा आकडा आता १ हजार २००च्या आसपास स्थिर आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण जिल्ह्य़ात २४ दिवसांवर आहे. राज्यात ४८ दिवसांवर तर देशात ६० दिवसांवर हे प्रमाण आहे. देशाचा मृत्युदर १.१, राज्याचा १.६ तर जिल्ह्य़ाचा १.८ आहे.