News Flash

मुंबईकरांना फटाके फोडण्यासाठी एकच दिवस; महापालिकेकडून फटाके बंदी

महापालिकेकडून नवी नियमावली जाहीर

संग्रहित

वाढत्या प्रदुषणामुळे करोना वाढण्याचा धोका असून, त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. राज्यातही सरकारनं सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मज्जाव करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनं फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं दिवाळीसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे.

काय आहे नवी नियमावली?

-करोनाबाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाही किंवा तत्म स्वरुपाची आतषबाजी महापालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

-हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतषबाजी आणि त्या संबंधिचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

-वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि पोलिसाद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

-१४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सोसायटीचे अंगण/घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरुपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी/ झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यायची आहे.

– ‘कोविड’च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतषबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. या प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.

-वरील संदर्भानुसार या प्रसंगी खबरदारीची उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण आणि पाण्याने हात योग्यप्रकारे आणि नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.

-वर नमूद केल्यानुसार केवळ दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी संध्याकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या/मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण आणि सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.

-‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना फिजिकल डिस्टन्स पाळणे, वारंवार साबणाने योग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी योग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

-यंदाच्या दिवाळीत दरवाजाजवळ रांगोळी काढताना अगर दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजाजवळ ठेवायचा आहे. जेणेकरुन, घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात-पाय-चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.

-यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करायची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.

-दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या/नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या फोनद्वारे किंवा व्हिडीओ कॉलद्वारे (Online Video Conferencing) घ्याव्यात.

-भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो व्हिडीओ कॉलद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.

-अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय आणि चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात, पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना आणि प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.

-दिवाळीकरता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 12:23 pm

Web Title: ban on firecrackers in mumbai except for lakshmipoojan bmc new guidlines for diwali bmh 90
Next Stories
1 मुलाला घरातून पळवण्यासाठी आईने पोलिसांवर फेकली मिरची पूड
2 मेट्रो प्रकल्पात मिठाचा खडा टाकू नका : मुख्यमंत्री
3 ३३ लाख ७१ हजार संशयित विलगीकरणातून मुक्त
Just Now!
X