पालिकेकडून ५२ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल
मुंबई : करोना संसर्ग पसरू नये यासाठी वारंवार सूचना करूनही मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या तब्बल १४ हजारांहून अधिक व्यक्तींकडून ५२ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जनजागृती करूनही मुखपट्टीचा वापर टाळणाऱ्यांविरुद्ध भविष्यात कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एप्रिल ते १२ सप्टेंबर या काळात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या चार हजार ९८९ जणांकडून ३३ लाख ६८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
दंडाची रक्कम अधिक असल्यामुळे पालिकेवर टीका करण्यात येत होती. तसेच पैसे नसल्यामुळे अनेक जण दंड भरण्यास असमर्थता दाखवीत होते, तसेच दंडात्मक कारवाई करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी वादही घालत होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने १२ सप्टेंबर रोजी दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून २०० रुपये केली. त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या काळात पालिकेने मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या नऊ हजार २१८ नागरिकांवर कारवाई करीत १९ लाख ७ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. एप्रिलपासून १६ नोव्हेंबपर्यंत एकूण १४ हजार २०७ नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या सर्वाकडून वसूल केलेली ५२ लाख ७६ हजार २०० रुपये रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे.
कारवाई अशी .. : पालिकेच्या के-पश्चिम म्हणजे अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरात ८९१ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून पालिकेने सर्वाधिक म्हणजे सहा लाख १५ हजार ८० रुपये दंड वसूल केला आहे. त्यापाठोपाठ आर-दक्षिण म्हणजे कांदिवली परिसरातील एक हजार ३३१ नागरिकांकडून सहा लाख सात हजार रुपये दंड वसूल केला आहे.