पावसाळ्यात मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलसेवा का कोलमलडते? असा प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला झापले आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मध्य रेल्वे उशिराने धावते आहे. तर पश्चिम रेल्वेची विरार ते बोरीवली दरम्यानची वाहतूक बंद आहे. नालासोपारा भागात रूळांवर पाणी साठल्याने ही सेवा बंद आहे. तर मध्य रेल्वेच्या सायन माटुंगा भागातही रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे. यामुळे सोमवार आणि मंगळवार मुंबईकरांना अतोनात हाल सहन करत ऑफिस गाठावे लागले. ज्या प्रवासाला एक ते सव्वा तास लागतो तिथे तीन ते साडेतीन तास लागत होते. पाऊस पडला की लोकलसेवेचे तीन तेरा वाजतात यावरूनच मुंबई हायकोर्टाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला खडे बोल सुनावले आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने इतक्या वर्षात काहीही केले नाही. रूळांवर पाणी साठण्याची समस्या आजची नाही तरीही त्यावर उपाय योजण्यात आलेले नाहीत. रेल्वे रूळांची उंची वाढवावी असे तुम्हाला वात नाही हे कोर्टाचे निरीक्षण आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साठले. पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडल्याचे दिसून आले. अशात आता कोर्टानेही मुंबईतील लोकल व्यवस्थेवर ताशेरे झाडत रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी इतक्या वर्षात काय केले असा प्रश्न विचारत रेल्वेला झापले आहे.

पश्चिम रेल्वेने सोमवरीच भर पावसातही थोडीशी उशिराने का होईना पण आम्ही सेवा सुरू ठेवली असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आता कोर्टाने मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी तुम्ही काहीही केले नाहीत असे म्हणत मध्य आणि पश्चिम रेल्वेला सुनावले आहे.