पालिकेच्या उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याविरोधात सुरक्षारक्षकांची तक्रार

साधारण लाखभर कर्मचारी संख्या असलेल्या महापालिकेत अधिकाऱ्याविरोधातील कर्मचाऱ्यांची आंदोलने नवी नाहीत. अधिकारी मानसिक छळ करतो, अशा तक्रारी तर शेकडय़ाने येतात. नको त्या ठिकाणी बदली करणारा, जास्त काम लादणारा, बेशिस्त[ची तक्रार करणारा अधिकारी कर्मचाऱ्यांना नकोसा असतो. पण शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे आलेली तक्रार मात्र थोडी वेगळ्या प्रकारची होती.  तक्रार होती उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याविरोधात. संबंधित अधिकारी सुरक्षारक्षकांविरोधात खोटय़ा तक्रारी करतो. यासोबतच त्यांची आणखी एक उपतक्रार होती, ती म्हणजे हा अधिकारी पैसे आणि मासेही मागतो.

सीएसटीसमोरच्या महापालिका मुख्यालयात मोर्चा येत असल्याचा सुगावा जरी लागला तरी प्रवेशद्वारावरचे सुरक्षारक्षक एकेकाची कसून चौकशी करतात. मात्र शुक्रवारी पालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर २०-२५ जणांच्या मोर्चाला कोणत्याही सुरक्षारक्षकाने अडवले नाही. कारण तो मुख्यालयातील सुरक्षारक्षकांचाच मोर्चा होता. आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात सुरक्षारक्षकांची मूळ तक्रार त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीबाबत आहे. २ फेब्रुवारी रोजी मुख्यालयातील तीन सुरक्षा रक्षकांविरोधात उपप्रमुख सुरक्षा अधिकारी अशोक चौबळ यांनी डायरीत खोटी तक्रार लिहिल्याचा आरोप सुरक्षारक्षकांनी केला. त्याचसोबत अखत्यारित येत नसतानाही उपायुक्तांना खोटी माहिती देऊन सुरक्षारक्षकांच्या बदलीला मंजुरी घेतल्याची तक्रारही आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे दिलेल्या पत्रात केली आहे. त्याही पुढे जात सुरक्षा रक्षकांनी केलेली तक्रार मात्र उत्सुकता वाढवणारी ठरली. पालिका वर्तुळात ती चर्चेचा विषय ठरली. ही चर्चा होती मासे मागण्याबाबत. सुरक्षा रक्षकांना मानसिक दबावाखाली ठेवून सुरक्षा  रक्षकांकडून वारंवार पैशांची मागणी करतात. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मंडई (मासळीबाजार) येथे काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वारंवार मच्छीची मागणी केली जाते. कल्याण येथील घरीही मासे घेऊन आणण्यास सांगितले जाते. आम्ही पैसे व माशांची मागणी पूर्ण करत शकत नसल्याने आमच्याविरोधात तक्रारी लिहिल्या जातात, असे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे. याविरोधात सुरक्षारक्षकांच्या सह्य़ांनिशी आयुक्तांना पत्र देण्यात आले असून महापालिकेच्या कर्मचारी संघटनेकडे दादही मागण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याने मात्र अशी कोणतीही मासेमागणी करण्यात आली नसल्याचे सांगितले.

दोन फेब्रुवारी रोजी प्रवेशद्वार क्रमांक तीनवर तैनात असलेले सुरक्षारक्षक दीड तास तिथे नसल्याची सीसीटीव्हीत दिसले. या प्रवेशद्वारातून महापौर व महत्त्वाच्या व्यक्ती येतात. या काळात तेथे काही अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार होते? त्यामुळे या रक्षकाविरोधात तक्रार लिहिली गेली. त्याचप्रमाणे उपायुक्तांच्या आदेशावरून सुरक्षारक्षकांच्या बदल्यांसंबंधीची माहिती त्यांना देण्यात आली. मी कोणाकडूनही  पैसे किंवा मासे मागितलेले नाही.   – अभय चौबळ, उपप्रमुख सुरक्षा अधिकारी