वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना १६ एप्रिलपर्यंत अलिबाग महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुभा दिली.

गोस्वामी यांच्यासह प्रकरणातील अन्य आरोपींनी कामाचे पैसे न दिल्याने अन्वय नाईक यांनी २०१८ मध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. रायगड पोलिसांनी २ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला.  त्यानंतर गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले.

सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांची जामिनावर सुटका केली.  या गुन्ह्यत रायगड पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह अन्य आरोपींवर अलिबाग न्यायालयात १८०० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग न्यायालयाने गोस्वामी यांना १० मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली असून शुक्रवारी त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी १० मार्चला आपल्याला अलिबाग महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर अनुपस्थित राहण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी गोस्वामी यांच्यातर्फे करण्यात आली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने हे प्रकरण सुनावणीसाठी आपल्यासमोर असल्याचे नमूद करत गोस्वामी यांना १६ एप्रिलपर्यंत अलिबाग न्यायालयात अनुपस्थित राहण्याची मुभा दिली.