मुंबई : मुंबई महापालिकेशी आणि २४ विभाग कार्यालयांशी संबंधित विविध तक्रारी हाताळण्यासाठी महापालिकेने समाजमाध्यमांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचे ४ बाय ७ हे मोबाइल अ‍ॅप, मुख्य ट्विटर खाते, सर्व विभागांशी संबंधित २४ ट्विटर खाते सुरू करण्यात आले आहेत. ही सगळी समाजमाध्यमे, त्यांची खाती सांभाळण्यासाठी पालिकेने महाआयटीद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्याचे ठरवले असून त्याकरिता पालिका तब्बल सहा कोटी खर्च करणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षाने याबाबतच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे ठरवले आहे.

नागरिकांना  विविध नागरी सेवा सुविधा देण्याबरोबरच विविध विषयांवरील तक्रारी नोंदवण्यासाठी ‘१९१६’सारखा विशेष दूरध्वनी क्रमांक किंवा MCGM 24×7 हे भ्रमणध्वनी आधारित अ‍ॅप आणि बृहन्मुंबई महापालिकेचे मुख्य ‘ट्विटर हॅण्डल’ सुरू करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्य ट्विटर हॅण्डल्F @mybmc  असून ट्विटर अकाऊंटचेही नाव ‘माझी Mumbai, आपली BMC असे आहे. हे हॅण्डल पूवीÊ k@DisasterMgmtBMCl असे होते. या खात्यांवर मुंबईकरांना आपल्या तक्रारी फोटोसह करता येतात. रस्त्यावर खड्डे पडले, कचरा उचलला नाही, भंगार सामान पडून आहे, अनधिकृत होर्डिग लागले अशा स्वरूपाच्या असंख्य तक्रारी या खात्यांवर करता येतात. ही सर्व माध्यमे महापालिकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मखाली एकत्र आणण्याचे ठरवले आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने सर्व विभागांसाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्यावतीने ३५ जणांचे मनुष्यबळ निर्माण केले आहे. त्याकरिता पालिका पुढील तीन वर्षांसाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आधीच या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यामुळे येत्या स्थायी समितीत या प्रस्तावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची देखभाल करण्यासाठी महाआयटीला ५ कोटी ७९ लाखांचे कंत्राट देण्यात आले. मात्र या कामासाठी रीतसर निविदा का मागवण्यात आल्या नाहीत,  असा सवाल रवी राजा यांनी केला.