कस्तुरबा रुग्णालयापाठोपाठ केईएममध्येही येत्या आठवडय़ाभरात करोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मान्यता घेण्यात आल्या असून प्रयोगशाळेत करोना तपासणीची यंत्रणा उपलब्ध झालेली आहे, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

सध्या कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत दिवसभरात सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीन वाजता दोन पाळ्यांमध्ये करोनाची तपासणी केली जाते. एका वेळेस ३३ नमुन्यांची तपासणी करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. यात घशातील आणि नाकाजवळील नमुने घेतले जातात. जे रुग्ण बाहेरील देशातून प्रवास करून आले आहेत आणि ज्यांना करोनाची लक्षणे आढळून आली आहेत त्यांचीच करोनाची चाचणी केली जाते. याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या अशा जोखमीच्या गटातील व्यक्तींचीही करोनाची तपासणी केली जाते. संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास आणि आवश्यकता भासल्यास तीन पाळ्यांमध्ये तपासणी केली जाईल, अशी माहिती कस्तुरबा मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी दिली.

दरम्यान, अंधेरीतील सेव्हन हिल्स येथे ३०० खाटांची विलगीकरण सुविधा शनिवारपासून कार्यरत झाली आहे. दोन वैद्यकीय अधिकारी आणि दोन कर्मचारी असलेले तीन गट या ठिकाणी नियुक्त केले आहेत. तसेच रुग्णांसाठी एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आली आहे.

सहकार्याचे आवाहन

संशयित रुग्णांना किंवा देखरेखीसाठी ठेवण्यात येणारे अलगीकरण (क्वारंटाईन) आणि प्रत्यक्ष करोनाबधित रुग्णांना ठेवण्यात येणारे विलगीकरण कक्ष वेगवेगळे आहेत. दोन्ही प्रकारच्या रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे देखरेखीसाठी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांनी घाबरू नये. करोनाबाधित रुग्णापासून त्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते. तेव्हा रुग्णांनी प्रतिबंधात्मक उपाय देखरेखीसाठी दाखल होण्यास सहकार्य करावे, असे कस्तुरबा मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी व्यक्त केले.