मुख्यमंत्री फडणवीस यांचा शिवसेनेला इशारा; ऐपतीप्रमाणे बोलण्याचा सल्ला
मुंबई मेट्रो-३ प्रकल्प असो, वा एकनाथ खडसे यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांना लक्ष्य करण्याचे होत असलेले ‘उद्योग’ असो, यापुढे ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या बेलगाम टीकेसंदर्भात ‘आपल्या ऐपतीप्रमाणे बोला’ असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने सातत्याने भाजपवर टीका करण्याचे सत्र अवलंबले आहे. औरंगाबादेत झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात तर भाजपची तुलना थेट निजामाशी करण्यात आली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सातत्याने टीकेचे लक्ष्य केले जात आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. सरकारचे काम चांगले चालले आहे. विरोधकांना आमच्याविरोधात कोणताही ठोस मुद्दा मिळत नाही. त्यामुळे माझ्या मंत्र्यांना लक्ष्य केले जात असून, त्यांच्यावर खोटे आरोप करण्याची तयारी सुरू आहे. यापुढे मंत्र्यांना लक्ष्य करणे खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. रणजित पाटील यांच्यावर खोटे आरोप विरोधकांनी करून पाहिले; परंतु त्यात काहीही तथ्य आढळले नाही. त्यानंतर एकनाथ खडसे यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होऊन त्यातून सत्य काय आहे ते समोर येईलच, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईची वाहतूक समस्या लक्षात घेऊन सागरी महामार्गापासून ‘मेट्रो-३’पर्यंत अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. दुर्दैवाने वस्तुस्थिती समजून न घेता सध्या शिवसेनेकडून ‘मेट्रो-३’ला विरोध केला जात आहे. ‘मेट्रो-३’ प्रकल्पामुळे गिरगावमध्ये ४० हजार लोकांना विस्थापित व्हावे लागणार असल्याची खोटी हाकाटी शिवसेनेकडून पिटली जात आहे. केवळ ६०० कुटुंबांच्या जागेचा प्रश्न असून त्यांना आहे तेथेच, म्हणजे गिरगावातच दुप्पट क्षेत्रफळाची घरे दिली जाणार आहेत. हुतात्मा चौक हलविण्यात येणार असल्याचे बोलले जात असून, मेट्रोसाठी हुतात्मा चौक हलविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ज्याने त्याने आपल्या ऐपतीप्रमाणे टीका करावी. ऐपत नसताना टीका करणाऱ्यांना कोण किंमत देणार? त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाईल.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मंत्र्यांनाही सल्ला
राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले त्या वेळीच भ्रष्टाचार, गैरव्यवहाराला या सरकारात स्थान नसेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. भ्रष्टाचाराच्या बाबतीत ‘शून्य सहनशीलता’ असे आमचे कठोर धोरण असून, मंत्र्यांनीही आपापले स्वीय सचिव, साहाय्यक अथवा जवळच्या व्यक्तींकडून कोणतीही आगळीक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. घोटाळ्याची जबाबदारी स्वीय साहाय्यक वगैरेंवर ढकलणे खपवून घेतले जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.