माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली. यावर लगेच कारवाई करण्याचे राज्यपाल महोदयांनी मान्य केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात भाजपा नेते आशिष शेलार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल महोदयांनी देखील नुकसानभरपाईसाठी मिळणारी आर्थिक मदत तातडीने मिळण्यासाठीच्या कार्यवाहीला आजच आपण गती देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आहे.

याचबरोबर, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून महाराष्ट्रातील सामान्य, गरीब रूग्णांना जी मदत मिळते. ती एका अर्थाने कुठंतरी खंडीत झाल्याचं दिसत आहे. राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्वतःच्या अख्त्यारित घ्यावा व राज्यपालांच्या कार्यालयातून देखील राज्यभरातील सामान्य, गरीब रुग्णांना थेट तातडीने मदत मिळावी. ही मदत खंडीत होऊ नये, अशी आणखी एक मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यपालांनी याबाबत देखील त्वरीत कार्यवाहीला सुरूवात होईल असे आश्वासन दिले आहे.