शाळा बंद असताना विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास साहित्य, उपक्रम पोहोचवून त्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचे सार्वत्रिक प्रयत्न राज्यात अद्यापही काहीसे तोकडे पडत असल्याचे दिसत आहे. ‘असर’च्या अहवालानुसार राज्यातील ६३.८ टक्केच विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य किंवा गृहपाठ मिळत असल्याचे दिसते आहे. साहित्य न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५८ टक्के विद्यार्थ्यांना शाळा साहित्य देत नसल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, सुविधा यांचे चित्र प्रथम फाऊंडेशन ‘असर’च्या माध्यमातून दरवर्षी मांडते. यंदा शिक्षण आणि शैक्षणिक वर्षांचे स्वरूप करोनाच्या प्रादुर्भावामुळे बदलले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रवाहातील विद्यार्थ्यांची पाहणी यंदा करण्यात आली. विद्यार्थ्यांकडील साधनांची उपलब्धता, पालकांचा सहभाग अशा मुद्दय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यातील ९८१ गावांतील ३ हजार ४०९ घरांतील ७ हजार ५०० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी साधारण ३६ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास साहित्य किंवा उपक्रम पोहोचत नसल्याचे दिसत आहे. साहित्य पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५८ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा साहित्य देत नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना गृहपाठ किंवा अभ्यास साहित्य हे बहुतांशी म्हणजे साधारण ९१ टक्के विद्यार्थ्यांना व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य न पोहोचवण्याचे कारण साधनांच्या उपलब्धतेचा अभाव हे देखील आहे. ३२.७ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, ८.८ टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही, ३.६ टक्के  विद्यार्थ्यांच्या घरी नेटवर्क मिळत नसल्याचे समोर आले. साधारण ७० टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्रोत पाठय़पुस्तक आहे.

शासकीय शाळांवर विश्वास वाढला

* गेल्या काही वर्षांपासून शासकीय शाळांतून खासगी शाळांकडे वाहणारा विद्यार्थी ओघ आता बदलताना दिसतो आहे.

* शासकीय शाळांतील प्रवेशाचे प्रमाण २०१८ च्या तुलनेत वाढल्याचे आणि खासगी शाळांतील घटल्याचे असरच्या पाहणीतून समोर आले आहे.

* शासकीय शाळांत प्रवेश घेतलेल्या पहिली ते दहावीतील मुलांचे प्रमाण ६३.८ टक्के आहे, ते २०१८ मध्ये ५३.२ टक्के होते.

* मुलींचे प्रमाण ६५ टक्के आहे ते २०१८ मध्ये ५३.७ टक्के होते.

* खासगी शाळांतील मुलांचे प्रमाण ४६.८ टक्क्य़ांवरून ३६.२ टक्के झाले आहे, तर मुलींचे प्रमाण ४२.७ टक्क्य़ांवरून ३५ टक्के झाले आहे.

* सध्या शाळा बंद असताना विद्यार्थी आणि पालकांशी संवाद ठेवणे, साहित्य पोहोचवणे, शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे यात शासकीय शाळा आघाडीवर आहेत.

पालकांच्या सहभागात वाढ

मुलांची अध्यापन प्रक्रिया, साधनांची उपलब्धता, शाळेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यात पालकांचा सहभाग वाढल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. पालकांची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी मुलांच्या शिक्षणाबाबत जागरुकता आणि सहभाग वाढला आहे. ८४.७ टक्के विद्यार्थी अभ्यासात पालकांची मदत घेत आहेत.