‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ या पालिकेच्या मोहिमेत खड्डय़ांबाबत सर्वाधिक ५० तक्रारी करता शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या प्रथमेश चव्हाण याने सर्वात जास्त म्हणजे पाच हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. त्याने केलेल्या तक्रारीतील १० खड्डे पालिकेला २४ तासात बुजवणे अशक्य झाले असून उर्वरित खड्डय़ांसाठी बक्षीस देणे पालिकेला भाग पडले आहे.

पालिकेने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबवली. यात तक्रार केल्यानंतर २४ तासात खड्डे बुजवले नाही तर ५०० रुपये अधिकाऱ्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशातून दिले जातील, असे प्रशासनाने जाहीर केले होते. यात सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ज्या खड्डय़ांच्या तक्रारी २४ तासात बुजवल्या गेल्या नाहीत अशा १५५ जणांना पालिकेला बक्षीस द्यावे लागले. आतापर्यंत सर्वाधिक किमतीचे बक्षीस प्रथमेश चव्हाण याने पटकावले आहे. त्याला आतापर्यंत पाच हजाराचे बक्षीस मिळाले आहे. एका व्यक्तीला केवळ दोनच तक्रारी करता येतील, अशी अट पालिकेने घातली होती. मात्र त्यालाही आव्हान देत प्रथमेशने चक्क ५० तक्रारी करून पालिकेच्या यंत्रणेतले दोषच दाखवून दिले आहेत. त्याने केलेल्या सगळ्या तक्रारीतील खड्डे पालिकेने बुजवले आहेत. मात्र जे खड्डे २४ तासात बुजवले गेले नाही, त्यासाठी रस्ते विभागातील संबंधित अभियंत्यांना त्याला १० खड्डय़ांसाठी ५००० रुपये द्यावे लागले आहेत.

मुंबईकर फक्त बोलतात, पण कोणी बदल घडवण्यासाठी काम करत नाही. म्हणून एक दिवस ठरवून तक्रारी केल्या, असे प्रथमेश याने सांगितले. ‘मायबीएमसी पॉटहोल फिक्सीट’ हे अ‍ॅप सुरू झाल्यापासून मी आतापर्यंत ७० तक्रारी केल्या आहेत. चालताना खड्डा दिसला की त्याच्या तक्रारी मी लगेच अ‍ॅपवर टाकायचो, असेही त्याने सांगितले.

एक दिवस फक्त खड्डयांच्या तक्रारींसाठीच

प्रथमेश हा दादरच्या बालमोहन शाळेचा विद्यार्थी असून नुकतेच त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तो सध्या महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतो आहे. पालिकेने जाहीर केलेल्या मोहिमेत त्याने सहभाग घेण्याचे ठरवले. एक संपूर्ण दिवस त्याने खड्डय़ांच्या तक्रारींसाठी खर्च केला. दुचाकीवरून शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तर सिद्धिविनायक मंदिरापासून ते धारावीपर्यंत प्रवास करत साडेचार तास खर्च करून त्याने या तक्रारी केल्या. त्याला साने गुरुजी शाळेजवळ, शिवाजी पार्क परिसर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या आतील रस्त्यांवर खूप मोठया प्रमाणावर खड्डे आढळले.