आरोपीला परत आणण्यासाठी काय पावले उचलली?
‘कॅसेट किंग’ गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला एकमेव परंतु ‘पॅरोल’वर फरारी असलेला आरोपी अब्दुल रौफ र्मचट याच्या हस्तांतरणासाठीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने त्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाला दिले आहेत.
‘पॅरोल’वर बाहेर पडल्यानंतर र्मचट बांगलादेशात पळून गेला होता. तेथे त्याला अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो तेथील तुरुंगात कैद आहे.
 मात्र त्याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारकडून काहीच केले जात नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आल्यावर न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग आणि इंटरपोलशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले होते.
 र्मचटने शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावर तसेच सरकारने १६ आरोपी निर्दोष सुटल्याच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले असून न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने र्मचटला परत आणण्याविषयी विचारणा केली.