पीएनबी बँकेला १३ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेला नीरव मोदी जर माझ्यासमोर आला तर त्याला चपलेने मारेन अशी संतप्त प्रतिक्रिया नीरव मोदी यांच्या कंपनीत कामाला असलेल्या अर्जुन पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली. नीरव मोदीने बँकांना चुना लावल्यामुळे २८०० पेक्षा जास्त कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्याच्या पापाची फळे इथे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागत आहेत असाही आरोप सुजाता पाटील यांनी केला.
सुजाता पाटील नेमके काय म्हटल्या?
आम्ही खूप साधीसुधी माणसे आहोत. माझे पती अर्जुन पाटील यांना या संपूर्ण प्रकरणात अडकवण्यात आले आहे. त्यांचा कोणत्याही गुन्ह्यात समावेश नाही. एका सामान्य माणसाला खूप वाईट पद्धतीने अडकवण्यात आले आहे. माझ्या नवऱ्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा.. नीरव मोदी समोर आला तर त्याला चपलेने हाणेन तुम्ही सगळ्या चॅनल्सवर तो व्हिडिओ दाखवा. आमची झालेली बदनामी कोण भरुन देणार?
माझी लहान मुले आहेत. अजूनही मी माझ्या घराचे कर्ज फेडते आहे. माझी लहान मुले आहेत. मला माझा नवरा सहीसलामत हवा आहे, बाकी काहीही नको असेही सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले आहे. २८०० कर्मचाऱ्यांची घरात पेटणारी चूल बंद झाली. त्याला जबाबदार कोण? कंपनीत साधे पेपरवर्क करणाऱ्या माणसाला अडकवता? असाही प्रश्न सुजाता पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ४०० कोटींचा चुना लावला आहे. त्यानंतर त्याच्या मालमत्तांवर आणि दुकानांवर टाच आणण्याची कारवाई ईडी आणि सीबीआयकडून सुरु आहे. याप्रकरणात बँकेच्या आणि नीरव मोदीच्या ज्वेलर्स शॉपमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही अटक करण्यात येते आहे. ईडीची छापेमारीही सुरु आहे. अशात अर्जुन पाटील यांच्या पत्नी सुजाता यांनी तर नवऱ्याचा काहीही दोष नसून नीरव मोदी समोर आला तर त्याला चपलेने मारेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.