विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसने तर या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणास लावल्याचं दिसत आहे. दररोज विविध दिग्ग्जांचे प्रवेश सोहळे सुरू आहेत. अनेकांनी टीएमसीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. आज अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांनी भाजपावर टीका केली आहे.

तसेच, अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजपाची सरकार सत्ता, पैसा आणि बळाचा वापर करत आहे. पूर्णपणे असं वातावरण निर्माण केलं जात आहे की, बंगालमध्ये भाजपाचं सरकार येणार आहे, मात्र वस्तुस्थिती ही आहे की, बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपाला जास्त जागा मिळू शकत नाही. आसाममध्ये देखील जे भाजपाचं सरकार आहे, निकालानंतर ५० ची संख्या राहील. मग अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही. आसामध्ये देखील भाजपा सत्तेतून बाहेर होणार आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व महाविकासाघाडी सरकारमधील कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

तर, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आज(रविवार) पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. मुलींवर अत्याचार केले,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारवर टीकास्त्र डागलं.