मनसेची तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

महापालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत ‘ट्वीट’ केल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदवीर कपिल शर्माच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सोमवारी शर्माविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. नगरसेवक व मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ही तक्रार केली असून शर्मा याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याने ५ लाखांची लाच मागितल्याचे ट्वीट कपिल शर्मा याने केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करत कारवाईचे आश्वासन दिले; परंतु कपिलने लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव उघड करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच कपिलने त्याच्या अंधेरी येथील कार्यालयाची उभारणी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संदीप देशपांडे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी कपिलविरोधात तक्रार दाखल केली. बेकायदा बांधकाम करणे आणि त्यासाठी तिवरांची कत्तल केल्याने कपिलविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

तहसीलदारांकडे तक्रार

  • मनसेच्याच सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी तहसीलदारांची भेट घेत शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे.
  • कपिलच्या बांधकाम सुरू असलेल्या कार्यालय परिसराची शालिनी यांनी पाहणी केली. कपिलवर अनधिकृत गौणखनिज भरावअंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
  • वन विभाग आणि तलाठी कार्यालयातील अधिकारी यांनीही या कार्यालयाची पाहणी केली. कपिलप्रमाणेच अनेकांनी या परिसरात बेकायदेशीर बांधकाम केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

नगरसेवक रईस शेख यांची नोटीस

महापालिकेची बदनामी केल्याबद्दल कपिल शर्मा याला नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य रईस शेख यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

कपिलच्या विधानामुळे महापालिकेची बदनामी झाली असून कपिलने त्याच्याकडे ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव ३ दिवसांत जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ३ दिवसांत नाव जाहीर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शेख यांनी दिला आहे.

समाजवादी पार्टीचे नगरसेवक रईस शेख यांनी सोमवारी वकिलाच्या माध्यमातून कपिल याला कायदेशीर नोटीस पाठवली. तीन दिवसांच्या आत त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव जाहीर न केल्यास केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि पालिकेच्या बदनामीसाठी अपप्रचार केल्याचे मान्य करून तुमच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराही या नोटिसीद्वारे शेख यांनी दिला आहे.

चौकशी करा-निरुपम

  • कपिल शर्मा प्रकरणाला शिवसेना-भाजप वेगळा रंग देऊ पाहात आहेत. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करुन लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत र्सवकष चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र पाठवून केली आहे.
  • स्वत:चे अपयश लपविण्यासाठी सेना-भाजपची धडपड सुरू आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
  • या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि लाच मागितल्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र संजय निरुपम यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना सादर केले आहे.

सचिन सावंत यांचे राम कदम यांना आव्हान

पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याच्या मागणीसाठी कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना लाच देऊ करणाऱ्या ठेकेदारांची नावे जाहीर करावी यासाठी त्यांच्या घराबाहेर आंदोलन करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

कपिल शर्मा याने भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अशी मागणी करीत राम कदम यांनी कपिल शर्माच्या घरासमोर आंदोलन केले. जलसंपदा विभागाच्या काही ठेकेदारांनी आपल्याला १०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट दीड वर्षांपूर्वी गिरीश महाजन यांनी केला होता. महाजन यांनी या ठेकेदारांची नावे जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. तसेच लाचलुचपत विभागाकडे तक्रार करून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. कपिल शर्माच्या ट्वीटची दखल घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना लाच देऊ करणाऱ्या ठेकेदारांची नावे जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, असे सचिन सावंत म्हणाले.