महिला प्रवाशांचा नाराजीचा सूर; वेळांमध्ये बदल करण्याची मागणी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा होती. मात्र बुधवारपासून सर्व महिलांचा लोकल प्रवास सुरू झाला. मात्र सकाळी ११ पासून लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळताच मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मोजकी स्थानके  सोडताच अन्य काही स्थानकातून या वेळेत प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमीच होती. ११च्या आधी कार्यालयीन वेळ असलेल्यांना रस्ते मार्गे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे लोकल प्रवास वेळेवरून महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

बुधवारी पश्चिम रेल्वेवरील विरार, बोरीवली, अंधेरी, वांद्रे, मध्य रेल्वेवरील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे, मुलुंड यांसह काही स्थानकांत सकाळी ११ नंतर महिला प्रवाशांच्या तिकीट खिडक्यांसमोर रांगा होत्या, तर अन्य स्थानकांत या वेळेत शुकशुकाटच होता. महिला प्रवाशांची अजिबात गर्दी नव्हती. खासगी कार्यालयातील मोजके च कर्मचारी, विविध शॉपमध्ये काम करणाऱ्या, रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या आणि अन्य कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांचा यात समावेश होता. तब्बल सहा महिन्यांनंतर लोकल प्रवास करताना महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यामुळे काही जण तर तिकिटांसोबत सेल्फी काढत होत्या.  या वेळेत प्रवासासाठी क्यूआर कोड ई-पासची गरज नसल्याने तिकीट खिडक्यांवर तिकीटही सहज उपलब्ध होत होते. प्रवासाची जरी परवानगी दिली तरी काही महिलांनी या वेळेविषयी नाराजीही व्यक्त के ली आणि प्रवास वेळ बदलण्याची मागणीही के ली.

सकाळी ११ ऐवजी आणखी दोन ते तीन तास आधी आणि सायंकाळी ७ ऐवजी ६ पासून प्रवासाची परवानगी द्यावी, अशी महिला प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.

सर्व महिलांसाठी लोकल सुरू के ल्याचा आनंद असला तरीही त्याची प्रवासाची वेळ योग्य नाही. ठाण्याला खासगी कं पनीत काम करते. सकाळी ९.३० वाजता कार्यालयीन वेळ आहे. त्यामुळे पनवेलहून बसने दीड ते दोन तास प्रवास करूनच कार्यालय गाठावे लागणार. कामाचा अर्धा दिवस भरून निघाल्यानंतर मी १२ वाजता निघाले. तेव्हा कु ठे लोकल प्रवास करण्यास मिळाला. लोकलचा म्हणावा तसा फायदा नाही. प्रवास वेळ आधीची करावी ही मागणी आहे.

– स्वाती कणसे, पनवेल</strong>

ठाण्याला एका बँके चे कर्जाबाबतच्या कामासाठी आले होते. गेल्या सहा महिन्यांत बसने जाताना तासन्तास प्रवासाला लागत होता. हा वेळ कमी झाला. लोकल प्रवास पूर्णपणे थांबला होता. पुन्हा प्रवास करण्यास मिळाल्याने बरे वाटले.

– अंजू तिवारी, डोंबिवली

ठाण्याला ब्युटी शॉपमध्ये काम करते. टाळेबंदीमुळे पहिले तीन महिने शॉप बंद होते. नंतर कामावर जाण्यास सुरुवात के ली. परंतु प्रवासासाठी बराच वेळ लागत असल्याने नोकरीसाठी जाता येत नव्हते. लोकल सुरू झाल्यानंतर पुन्हा नोकरीसाठी बोलावण्यात आले. फक्त सकाळी व सायंकाळी असलेल्या प्रवास वेळेचा रेल्वे, राज्य सरकारने विचार करावा.                

– मीना साडविलकर, दिवा

लोकल प्रवासाची परवानगी देऊन रेल्वेने महिलांना दिलासा दिला आहे, परंतु सकाळी ११ ऐवजी अर्धा ते एक तास आधी वेळ करावी आणि सायंकाळच्या वेळेतही बदल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु हे करतानाच चांगले आरोग्य व अर्थकारण सुरू ठेवण्यासाठी खासगी कार्यालय व उद्योगांनी कार्यालयीन वेळेत बदल करणे गरजेचे आहे.         

– लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ