‘झी २४ तास’ आणि ‘झी मराठी’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘चला खेळू या मंगळागौर’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’ हे या स्पर्धेचे मुद्रितमाध्यम प्रायोजक आहेत.
राज्यात विविध ठिकाणी ‘चला खेळू या मंगळागौर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महिला मंडळांना या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन ‘झी समूहा’तर्फे करण्यात आले आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई नाटय़गृहातील कार्यक्रमापासून बुधवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. या वेळी ऋजुता बागवे व उमा गोखले (नांदा सौख्य भरे) आणि सुरुची आडारकर (का रे दुरावा) या अभिनेत्री उपस्थित होत्या. रामबंधू टेम्प्टीन प्रस्तुत, पनवलेकर ग्रुप, अभ्युदय बँक, मांडके हिअरिंग सव्र्हिस आणि मंगलाष्टक डॉट कॉम यांनी सहप्रायोजित केलेल्या ‘चला खेळू या मंगळागौर’ या स्पर्धेत परीक्षक म्हणून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, मेधा भागवत यांच्यासारखे सेलेब्रिटी कलाकार काम पाहणार असून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री तन्वी पालव हे दोघेही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर ‘सारेगमप’चे गायक आणि ‘डीआयडी’ या रिअॅलिटी शोच्या स्पर्धकांचे सादरीकरण हेही या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ असेल.
या कार्यक्रमाचे प्रक्षेपण १ सप्टेंबरपासून १० सप्टेंबपर्यंत ‘झी २४ तास’ वाहिनीवर सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येईल. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ०२२-२४८२७७९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रत्येक ठिकाणच्या स्पर्धेतून एक विजेता निवडला जाईल आणि त्यानंतर निवडलेल्या सात विजेत्यांमध्ये अंतिम फेरीसाठी पुन्हा खेळ रंगेल. या स्पर्धेची अंतिम फेरी ४ सप्टेंबरला माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात रंगणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक..
* २० ऑगस्ट : गडकरी रंगायतन, ठाणे (अंकुश चौधरी व वंदना गुप्ते यांची उपस्थिती)
* २४ ऑगस्ट : कालिदास नाटय़गृह, नाशिक
* २७ ऑगस्ट : एसडीडीसी हॉल, सातारा
* २८ ऑगस्ट : विष्णुदास भावे नाटय़गृह, सांगली
* ३० ऑगस्ट : हुतात्मा रंगमंदिर, सोलापूर
* ३१ ऑगस्ट : टिळक स्मारक, पुणे
(प्रत्येक ठिकाणी सायंकाळी ४.३० वाजता स्पर्धा रंगणार आहे)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 1:41 am