करोनाकाळातही मंडळांचा अट्टहास; आकार कमी करण्याच्या पालिका, पोलिसांच्या सूचना

इंद्रायणी नार्वेकर, प्रतिनिधी

मुंबई : करोनाच्या संकटामुळे या वर्षी सार्वजनिक गणेशमूर्ती चार फुटांपर्यंतच असावी असा नियम करण्यात आला असला तरी काही मंडळांनी आपले मंडप मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच आकाराने मोठे उभारले आहेत. जागेवरील दावा कायम राहावा किंवा सामाजिक उपक्रम राबवता यावेत, यासाठी काही मंडळांनी मंडपाचा आकार मोठाच ठेवला आहे. मात्र, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी याला आक्षेप घेऊन दोन दिवसांत मंडपाचा आकार कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या वर्षीच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असून गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्या चौकटीतच यंदा गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. घरगुती मूर्ती २ फुटांपर्यंत, तर सार्वजनिक मूर्ती ४ फुटांपर्यंत असावी हा प्रमुख नियम आहे. तसेच मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते असू नयेत, आरती तसेच आगमन व विसर्जनाच्या वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते असू नयेत असे नियम करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करताना येत्या मंडळांचा कस लागणार आहे. तसेच मंडपांचा आकारही कमीत कमी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र मुंबईत काही ठिकाणी मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच आपल्या मंडपाचा आकार ठेवला आहे. त्यामुळे यंदाही अनेक ठिकाणी रस्ता आक्र सला जाऊन मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. आता अशा ठिकाणी जाऊन पोलीस किंवा पालिकेचे अधिकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समज देत आहेत. मंडपांचा आकार तत्काळ कमी करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. तसेच अनेक विभागांमध्ये पोलीस आणि विभाग अधिकाऱ्यांनी दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे बैठक घेऊन मंडपाचा आकोर कमी करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

ग्रँट रोड, ताडदेव परिसराचा भाग असलेल्या डी विभागाच्या हद्दीत तसेच वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागाच्या हद्दीत अशा तक्रोरी अधिक आहेत. ग्रँट रोडमध्ये स्लेटर रोड मंडळ, तर वरळीत सुपर स्टार क्रीडा मंडळ यांना पालिकेतर्फे समज देण्यात आली आहे. त्यांनाही मंडपाचा आकार कमी करण्यास सांगण्यात आले आहे.

‘‘काही मंडळांनी आपल्या दरवर्षीच्या पद्धतीने मंडपाचा आकार मोठा ठेवला होता. या वर्षी मूर्ती लहान आहे, देखावा नाही, लोक दर्शनाला येऊ शकणार नाहीत, त्यामुळे मंडपाचा आकार कमी ठेवा, असे आवाहन आम्ही मंडळांना केले आहे,’’ अशी माहिती डी विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली, तर ‘‘मोठा मंडप बांधला की तेथे गर्दी होणार, हे गृहीत धरून मंडळांनी खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहन गणेशोत्सव समितीचे अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केले.

‘नियमांबद्दल अनभिज्ञ’

आम्ही नेहमीप्रमाणे २०० चौरस फुटांचा मंडप बांधला होता. उंची १२ फूट होती. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला मंडप लहान करायला सांगितले. आम्हाला हा नियम माहीत नव्हता; पण आता आम्ही त्यांच्या सूचनेनुसार मंडप लहान केले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावायला सांगितले आहेत, अशी प्रतिक्रिया वरळीतील सुपर स्टार क्रीडा मंडळाचे संतोष गुप्ता यांनी दिली.