प्रवासी प्रतीक्षेत, चालक-वाहकांवर कारवाई होणार

मुंबई : नवी मुंबईतील उड्डाणपुलाच्या खाली असणाऱ्या बस थांब्यावर न थांबताच ‘शॉर्टकट’ म्हणून एसटीचालक उड्डाणपुलावरून गाडय़ा नेण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिष्ठत राहावे लागत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर एसटी महामंडळाने १४ सप्टेंबरपासून विशेष तपासणी मोहीम घेतली आहे. मुंबई ते पनवेल व त्यापुढे प्रवास करताना असलेल्या उड्डाणपुलांच्या खाली एसटीचे बस थांबे आहेत. परंतु चालक हे थांबे न घेताच जवळचा मार्ग म्हणून उड्डाणपुलाचा वापर करून पुढे रवाना होतात. त्यामुळे एसटीची वाट पाहत उभे असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. याविरोधात तक्रारी आल्यानंतर एसटीच्या मार्ग तपासणी पथकाने या पंधरवडा मोहिमेतच कारवाईला सुरुवात केली. मुंबई ते अलिबाग, मुंबई ते पुणे, मुंबई ते पैठण यासह अन्य गाडय़ा नेरुळ, खारघर, वाशी, कळंबोलीसह अन्य दोन ठिकाणी असलेले बस थांबे वगळून नवी मुंबईतील उड्डाणपुलावरून जात असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. या गाडय़ा पकडून चालक-वाहकांना जाबही विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचा अहवाल बनवून संबंधित विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार या चालक-वाहकांवर निलंबनाचीही कारवाई होऊ शकते.