राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घेण्याची मागणी केली. विविध प्रसारमाध्यमांतील चर्चेतून काँग्रेस राष्ट्रवादीला १२४ जागा देण्यास तयार असल्याचे कानावर पडत आहे. मात्र, काँग्रेस पक्षाचा १२४ जागांचा प्रस्तावही राष्ट्रवादीला अमान्य असल्याचे पटेलांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभेतील कामगिरीच्या निकषावर विधानसभेच्या जागावाटपाचे सूत्र ठरत आले आहे. त्यामुळे यावेळची राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी पाहता, पक्षाला विधानसभेच्या जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र, निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी, काँग्रेसकडून जागावाटपासंदर्भात राष्ट्रावादीकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवार निश्चितीची प्रक्रिया रखडली असून, याबाबत काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या १५ वर्षांपासून एकत्र असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यावेळीही कायम रहावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी शनिवारी सकाळी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी जागावाटपाच्या मागणीवर अडून बसल्यास काँग्रेस पक्षाला स्वतंत्र लढावे लागेल, असा इशारा दिला होता.