मुंबई उपनगरीय सेवेबाबत तयार करण्यात येत असलेल्या श्वेतपत्रिकेत जलद व धीम्या गाडय़ांचे तिकीटदर वेगळे ठेवण्याबाबत शिफारस करण्यात आल्याचे वृत्त पसरले आहे. मात्र या श्वेतपत्रिकेच्या अंतिम मसुद्यात अशी कोणतीही शिफारस नसल्याचे स्पष्ट करत जलद गाडय़ांचे तिकीटदर वाढण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.
उपनगरीय सेवेबाबत श्वेतपत्रिका करण्याचा मानस रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडे ही श्वेतपत्रिका करण्याचे काम सोपवण्यात आले. सध्या ही पत्रिका तयार करण्याचे काम सुरू असून त्यात रेल्वेच्या समस्या, फायद्या-तोटय़ाचे गणित, उत्पन्न खर्चाचा मेळ, रेल्वे प्रकल्पांची सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यात येईल. त्याचसोबत उपनगरीय सेवेला फायद्यात आणण्यासाठी तरतुदी व शिफारशी मांडणेही अपेक्षित आहे.
या शिफारशींमध्ये जलद गाडय़ांचे तिकीट दर धीम्या गाडय़ांपेक्षा अधिक ठेवण्याची शिफारस केल्याचे वृत्त सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मात्र अशी कोणतीही शिफारस अंतिम मसुद्यात करण्यात आलेली नाही, असे मुंबई विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेची श्वेतपत्रिका येत्या पंधरा दिवसात जाहीर होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.