राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात (काल) पर्यावरण दिनी झालेल्या वृक्षतोडीवरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वरळीत झालेल्या या वृक्षतोडीची पाहणी केली. होर्डिंगसाठी झाडं कापली गेली असा आरोप यावेळी दरेकरांनी केला आहे. तसेच, “पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातचं झाडांची कत्तल झाली. हा कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असून याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. मुंबई मनपा व पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच झाडांची अमानुष कत्तल करण्याची हिंमत वृक्षशत्रू दाखवू शकले. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.” अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

तसेच, “जागतिक पर्यावरण दिनाची पानभर जाहिरात देणाऱ्या पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात, तो पेपर शिळा होण्याअगोदरच रात्रीच्या अंधारात झाडांची अमानुष कत्तल? कशासाठी? होर्डिंग दिसावेत म्हणून! की कंत्राटदारांचं हीत? बेंबीच्या देठापासून मेट्रो कारशेडला विरोध करणारे, याचं उत्तर देतील का?” असा सवाल दरेकरांनी केला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला खुलेआम वृक्षतोड झाली. आज मुंबई भाजपा अध्यक्ष एमपी लोढा यांच्यासह वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली, नागरिक आणि डीसीपी यांच्याकडून माहिती घेतली, अशी माहिती देत दरेकर माध्यमांशी या संदर्भात बोलताना म्हणाले की, “इथं स्पष्ट दिसत आहे की, होर्डिंग्ज आहेत त्याला ही झाडं अडसर ठरत होती. त्यामुळे हे झाडं कापण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. मला वाटतं यावर कडक कारवाई झाली पाहिजे. केवळ दोन दिवस वातावरण संतप्त आहे म्हणून, कारवाई करतोय असं दाखवून जमणार नाही. इथल्या नागरिकांनी देखील माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे सर्व पुरावे असल्याने, या आधारे दोन दिवसात संबधितांवर गुन्हे दाखल करून, कारवाई झाली पाहिजे.”

याचबरोबर “माझी तर मागणी राहील, महापालिकेचं वृक्ष प्राधीकरण असेल किंवा बीएमसीचे जबाबदार अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण, झाडांच्या फांद्या अडव्या आल्या व नागरिकांनी तक्रार केली तर दोन-दोन महिने वेळ नसतो. त्या फांद्या पडून घरांचं नुकसान होतं, माणसं मरतात आणि आता सकाळी कुणीतरी येतं व सर्रास कत्तल करतं. कोणालाही पाठीशी घालायचं कारण नाही. आम्ही कुणावरी वैयक्तिक रागापोटी आलेलो नाही. परंतु हा पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथंच जर कुंपणच शेत खायला लागलं. तर शेवटी लोकांनी कुणाकडे अपेक्षेने पाहायचं. म्हणून मुंबईचे आमचे भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह मी पाहणी करण्यासाठी आलो आहे. अत्यंत हृदयद्रावक असं चित्र आहे. आज एकीकडे ऑक्सिजन कमतरता व वृक्षारोपणाची आवश्यकता असताना, झाडं तोडणं हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं कृत्य आहे. याचा जाब विचारला जाईल, पोलिसांना देखील तशाप्रकारच्या कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी देखील आम्हाला कडक कारवाईबाबत शब्द दिला आहे.” असं देखील यावेळी प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

तर, दरेकरांच्या आरोपाला शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिलं असून, आरोप सिद्ध करा असं आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दरेकरांना दिलं आहे. याचबरोबर झाडं कापणाऱ्यांचा पोलीस शोध घेतील, असं देखील महापौरांनी सांगितलं आहे.

महालक्ष्मी येथे काही झाडे तोडण्यात आली आहेत. महापालिकेने अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. असे म्हटले जात आहे की कदाचित वृक्षांना होर्डिंग्ज लावण्यासाठी पाडले गेले असेल. आरोपींवर कारवाई केली जाईल. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.