प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या कारची नंबर प्लेट वापरुन फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील मोटार वाहन कायद्यांच्या उल्लंघनाचे हे गंभीर प्रकरण आहे. आरोपीकडून बेकायदपणे रतन टाटा यांच्या मालकीच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर सुरु होता. मुंबई वाहतूक पोलिसांनी कारचे चालन कापून ई-चालान रतन टाटा यांच्या कार्यालयात पाठवले. रतन टाटा यांच्या कार्यालयाकडून चौकशी झाली, तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. ज्या कारचे ई-चालान पाठवण्यात आले होते, ती कार त्या ठिकाणी कधी गेलीच नसल्याचे स्पष्ट झाले.

MH01 DK 0111 हा रतन टाटा यांच्या कारचा नंबर कोणीतर महिला वापरत होती. वेगवेगळया सूत्रांकडून माहिती मिळवल्यानंतर, रतन टाटा यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचा बेकायद वापर सुरु असल्याचे पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यांतर MH01 DK 0111 याच नंबर प्लेटची एक दुसरी कार माटुंगा फाईव्ह गार्डन परिसरात पोलिसांना आढळली.

पोलिसांनी ती कार जप्त करुन चौकशी सुरु केली. कुणीतरी महिला ती कार चालवत असल्याचे तपासातून समोर आले. मुंबई शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करुन पोलिसांनी बनावट वाहन क्रमांकाचा वापर करणाऱ्या कार मालकाला शोधून काढले. तपासात हे वाहन नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा लिमिटेडच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला.

अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी आरोपी मूळ नंबर प्लेटमध्ये बदल करुन बनावट नंबर प्लेटचा वापर करत होता. माटुंगा पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट नंबर प्लेटच्या या प्रकारामुळे रतन टाटा यांच्या गाडीवर चुकीने आकारण्यात आलेले इचलन आरोपी इसमाच्या वाहनावर वर्ग करण्यात आले आहे.