टाळेबंदी शिथिल होताच आर्थिक राजधानी मुंबईच्या दिशेने परराज्यातून येणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे २५ लाख प्रवासी विशेष रेल्वे गाडय़ांमधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. यामध्ये उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मध्य रेल्वेवरून सर्वाधिक १६ लाख प्रवासी आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टाळेबंदी लागताच अनेक कामगार, मजुर कुटुंबीयांसह परराज्यात रवाना झाले. त्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्या. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने जून महिन्यापासून सामान्य प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाडय़ा चालवण्यास सुरुवात केली व श्रमिक गाडय़ांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. परंतु जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिल होण्यास सुरुवात झाली आणि आपले बिघडलेले अर्थचक्र  पुन्हा सुरळीत करण्यासाठी परराज्यात गेलेला मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागला आहे.

मध्य रेल्वेच्या विशेष गाडय़ांमधून मुंबई महानगरात सर्वाधिक प्रवासी परतले आहेत. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी १५ विशेष गाडय़ा सोडल्या. तेवढय़ाच गाडय़ा मुंबईत येत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एकू ण १६ लाख ५० हजार जण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.

गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), दरभंगा ते एलटीटी, गोरखपूर ते एलटीटी, वाराणसी ते सीएसएमटी, भुवनेश्वर ते सीएसएमटी, हैद्राबाद ते सीएसएमटी, बंगळूरु ते सीएसएमटी यासह अन्य भागातून गाडय़ा मुंबईत दर दिवशी दाखल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाडय़ांना मुंबईच्या दिशेने येण्यासाठी २०० ते ३०० प्रतीक्षा यादीही लागत असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील जोधपूर, अमृतसर, नवी दिल्ली, गोरखपूर, मुझफ्फरपूर इत्यादी विभागातून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसपर्यंत गाडय़ा दाखल झाल्या.