वातानुकूलित लोकलमध्ये पहिला प्रयोग

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये ‘शॉपिंग ऑन व्हील्स’ची योजना अमलात आल्यानंतर आता प्रथमच उपनगरीय गाडय़ांमध्येही अशीच योजना अमलात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये सुरुवातीला प्रवाशांना विविध वस्तूंची खरेदी (शॉपिंग) करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही योजना राबवण्यासाठी पश्चिम रेल्वे एका खासगी कंपनीची नियुक्ती करणार आहे.

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या वातानुकूलित लोकल गाडीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. या लोकलच्या दिवसातील बारापैकी केवळ तीन ते चार फेऱ्यांनाच प्रतिसाद मिळतो. एका लोकलची प्रवासी क्षमता ५ हजारपेक्षा जास्त असतानाही सरासरी सुमारे दीड हजार प्रवासीच प्रवास करतात. त्यामुळे या लोकल गाडीला प्रतिसाद वाढवण्याचे मोठे आव्हान पश्चिम रेल्वेसमोर आहे. त्यासाठीच लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांसाठी गेल्या वर्षीपासून सुरू झालेली ‘शॉपिंग ऑन व्हील्स’ योजना लोकलमध्येही सुरू केली जाणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये रेल्वे प्रशासन नियुक्त विक्रेत्यांकडून प्रवाशांना विविध वस्तू विकण्यात येतात. हीच योजना वातानुकूलित लोकलमध्ये राबविली जाणार आहे. यामध्ये त्वचा, केस यांसाठीची उत्पादने, खेळणी, लॅपटॉप व मोबाइलशी संबंधित वस्तू, स्टेशनरी इत्यादी विकण्याची परवानगी दिली जाईल. मात्र ही विक्री अधिकृत विक्रेत्यांकडूनच होईल. विमानात खाद्यपदार्थाची ने-आण करण्याकरिता जसा ट्रॉलीचा वापर होतो, तशाच प्रकारच्या ट्रॉलीत या वस्तू मांडल्या जातील.

अर्ज मागवले

पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वातानुकूलित लोकलमध्ये विक्रीसाठी रुची दाखवणाऱ्या कंपन्यांचे अर्ज मागवले असल्याचे सांगितले. त्यासाठी २७ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेमक्या कोणत्या वस्तूंची विक्री होणार, त्यांची किंमत इत्यादी निश्चित होईल. मात्र एकाच कंपनीचे चार विक्रेते नियुक्त केले जातील. त्यांना गणवेश व ओळखपत्र दिले जाईल. सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत विविध वस्तूंची विक्री या लोकलमध्ये करण्याची मुभा दिली जाणार असल्याचे सांगितले.