वडाळा ते सातरस्ता मार्ग मोकळा

मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) या मोनो प्रकल्पासाठी प्रस्तावित असणाऱ्या पाच मोनो गाडय़ांच्या खरेदीसाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) सुमारे २०० कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. गाडय़ांच्या खरेदीसाठीची निविदा प्राधिकरणाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, तर वडाळा ते सातरस्ता असा बहुप्रतीक्षित मोनो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे २७ फेब्रुवारीला लोकार्पण करण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे.

मोनो प्रकल्पातील वडाळा ते सातरस्ता असा १२ किमीचा दुसरा टप्पा सुरू करण्याची तयारी ‘एमएमआरडीए’ने केली आहे. यासाठी दोन मोनो गाडय़ांच्या दुरुस्तीचे काम सध्या वडाळ्यातील मोनो कार डेपोमध्ये सुरू आहे. कार डेपोमध्ये नादुरुस्त असलेल्या मोनो गाडय़ांचे यांत्रिक भाग दोन आठवडय़ांपूर्वी प्राधिकरणाच्या ताब्यात आले होते. या भागांची जुळवाजुळव करून दुसऱ्या टप्प्याची सेवा कार्यान्वित करण्यासाठी दोन गाडय़ांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. २७ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्याची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मोनो प्रशासनातीला एका अधिकाऱ्याने दिली. यासाठी सध्या रात्री १० वाजल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर मोनो गाडय़ाची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. सेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येकी २० मिनिटांच्या कालावधीने प्रवाशांना गाडी उपलब्ध होईल. काही माहिने एकूण पाच गाडय़ांच्या बळावर संपूर्ण १९ किमीच्या मार्गिकेवरील सेवा सुरू राहणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामध्ये अतिरिक्त मोनो गाडय़ांची भर पडेल.

१५ गाडय़ांची आवश्यकता

१९ किमीच्या मोनो मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १५ गाडय़ांची आवश्यकता आहे. स्कोमीने प्रकल्प सुरू करताना १० गाडय़ांची खरेदी केली होती. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने १० गाडय़ांची खरेदी किंमत स्कोमीला दिली होती, तर उर्वरित पाच गाडय़ांसाठीचा खर्च राखीव ठेवला होता. आता दुसरा टप्पा सुरू करून भविष्यातील मोनोची वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पाच गाडय़ांची गरज आहे. त्यासाठी राखून ठेवलेले २०० कोटी रुपयांच्या बळावर प्रत्येकी ४० कोटी रुपयांच्या पाच गाडय़ांची खरेदी करणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासाठी लवकरच निविदा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.