News Flash

सेना-भाजप यांच्यात ‘सामना’ टळला, वाद कायम

अ‍ॅड. शेलार म्हणाले, यंदा उगाच वाद नको, यासाठी विमानतळाबाहेर आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही,

शिवसेनेचे छत्रपतीप्रेम दाखविण्यापुरतेच : आशीष शेलार

भाजप-शिवसेनेत मुंबई विमानतळाबाहेर महाराष्ट्रदिनी छत्रपती शिवरायांच्या अभिवादनावरून यंदा ‘सामना’ रंगला नाही, पण ‘शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम दाखविण्यापुरतेच बेगडी’ असल्याचा टोला लगावत, निष्कारण वाद नको, म्हणून तेथे यंदा भाजपने कार्यक्रम घेतला नाही, असे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी स्पष्ट केले. मुंबईत भाजपने महाराष्ट्रदिनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुंबईत आमची ताकद वाढली असून भाजपने आनंदोत्सव सोहळ्यात ‘शिवराज्याभिषेक’ आयोजित केला असल्याचे शेलार यांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेल्यावर्षी भाजप-शिवसेनेने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. विमानतळाबाहेरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रमासाठी दोघांनीही परवानगी मागितली. भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील देखावे आणि अन्य सजावट करण्यात आली होती, तर शिवसेनेने अखंड महाराष्ट्राचा देखावा सादर केला होता. दोन्ही पक्षांनी जागा मागितल्याने शेवटी भाजपने तडजोड करीत पूर्वसंध्येला ३० एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा केला, मात्र निवडणुकीची रणधुमाळी संपल्याने यंदा विमानतळाबाहेर उभयपक्षी ‘सामना’ रंगला नाही.

यासंदर्भात विचारता अ‍ॅड. शेलार म्हणाले, यंदा उगाच वाद नको, यासाठी विमानतळाबाहेर आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही, मात्र मुंबईत २५७ कार्यक्रमांचे आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात १०० चौकांमध्ये सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे रेक्लमेशन येथे सायंकाळी उशिरा भव्य कार्यक्रम होत आहे, असे शेलार यांनी सांगितले. मुंबईत भाजपची ताकद वाढल्याचे महापालिका निवडणुकीत दिसून आले आहे. आमचे शिवरायांवरचे प्रेम शिवसेनेसारखे बेगडी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे प्रत्युत्तर ; निवडणुकीत मतांसाठी भाजपला छत्रपतींची आठवण

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेनेने कधीही निवडणुकीत मते मागितली नाहीत, उलट भाजपला निवडणुकीत शिवरायांची आठवण झाली आणि ‘छत्रपतींचे आशीर्वाद’ मागितले, असे सणसणीत प्रत्युत्तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. भाजपने महाराष्ट्र दिन साजरा करणे हाच दांभिकपणा असून स्वतंत्र विदर्भ करणार नाही आणि बेळगाव, कारवार, निपाणी आदींसह अखंड महाराष्ट्र राहील, हे जाहीर करण्याची मागणी सावंत यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांशी शिवसेनेचे नाते पहिल्यापासून आहे आणि निवडणुकीसाठी त्याचा वापर आम्ही कधीही केला नाही. शिवजयंती व अन्य उत्सव शिवसेना कार्यकर्ते वर्षांनुवर्षे साजरे करीत आहेत. भाजपलाच शिवरायांची आठवण निवडणुकीत मते मिळविण्यासाठी झाली आणि त्यांनी कार्यक्रम सुरू केले, हाच बेगडीपणा असल्याचे सावंत यांनी शेलार यांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले. बेळगाव प्रश्न असो, मराठीचा मुद्दा असो, शिवसेनेची भूमिका कायमच आक्रमक आणि राज्याच्या हिताचे रक्षण करणारी राहिली आहे, असेही त्यांनी बेळगावसह अन्य मुद्दय़ांचा संदर्भ देत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 3:43 am

Web Title: shiv sena using shivaji name for political benefits says ashish shelar
Next Stories
1 संरक्षित सागरी जीव धोक्यात!
2 न वापरलेल्या औषधाच्या परताव्यासाठी याचिका
3 अस्वच्छ शौचालय स्वच्छ दाखविण्यासाठी धडपड
Just Now!
X