शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्त्यसंस्कार झालेल्या ठिकाणी उभारण्यात आलेला चौथरा शिवसेनेने अखेर मंगळवारी पहाटे हटवला. मात्र, या जागेवर ८०० चौरस फुटांचे उद्यान उभारून त्यात मातीचा स्मृती-चौथरा उभारण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीही देण्यात आली. मात्र, सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच याला परवानगी देण्यात येईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे.
अन्त्यसंस्काराची जागा मोकळी करून पालिकेच्या ताब्यात देण्यावरून शिवसेनेने महिनाभर बराच घोळ घातला होता. सतरा डिसेंबरला सदर जागा रिकामी करून देण्याचा वायदाही केला होता. प्रत्यक्षात अठराच्या मध्यरात्री चौथरा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आणि पहाटे चापर्यंत चौथऱ्याची जागा मोकळी करण्यात आली. काढलेल्या चौथऱ्याची माती भरून निघालेले ट्रक शिवाजी पार्कलगतच्या समुद्रकिनारी गेले आणि तेथे रिकामे झाले.  
चौथरा हटवल्यानंतर मंगळवारी दुपारी पालिकेत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली. शिवाजी पार्कवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील जागेत ८०० चौ. फुटांचे उद्यान तयार करून लोकांना नतमस्तक होण्यासाठी मातीचा स्मृती-चौथरा उभारण्यात यावा, असा प्रस्ताव पालिका सभागृह नेते यशोधर फणसे यांनी या बैठकीत मांडला. त्यामध्ये सावध पवित्रा घेत कायद्यात बसत असेल तरच आम्ही याला मंजुरी देत आहोत, असे सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. पण मनसेच्या गटनेत्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट न करता थेट बाळासाहेबांबद्दल भाषणच सुरू केले. स्मृती चौथऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न उपस्थित करत मनसेने आपली भूमिका मात्र गुलदस्त्यातच ठेवली.  
गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर आयुक्तांशी याबाबत संपर्क साधला असता हा बांधकामविरहित चौथरा आहे. त्यामुळे त्याची तपासणी अतिरिक्त पालिका आयुक्तांमार्फत करून कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पण गटनेत्यांच्या बैठकीनंतर उद्यानाबाबतच्या बाकीच्या कामाला भलताच वेग आला. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे तात्काळ अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांना शिवाजी पार्कवर पाहणीसाठी घेऊन गेले. पण संबंधित विभागाशी सल्लामसलत करून निर्णय घेऊ, असे अडतानी यांनी सांगितले. मात्र, शिवाजीपार्कवर बांधकामविरहित स्मृती-चौथऱ्याच्या उद्यानाला प्रशासनानेही हिरवा कंदील दिला असल्याचे समजते.    
पोलिसांच्या हुशारीमुळे शिवसेनेची योजना फसली
१७ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर चौथरा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आणि पहाटे चापर्यंत चौथऱ्याची जागा मोकळी करण्यात आली. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा एवढय़ा गोपनीय पद्धतीने रिकामी का करण्यात आली हे तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनाही समजत नव्हते. जेथे कालपर्यंत हजारो लोक दर्शनासाठी येत होते तेथेच एखादी गुप्त कारवाई केल्याच्या थाटात चौथरा हलविला गेला. पहाटेच्या अंधारात चौथरा हटवतानाच स्मारकाच्या नावाखाली उद्यान तयार करण्याची योजना सेनेच्या चाणाक्यांनी आखली होती मात्र पोलिसांच्या हुषारीमुळे ही योजना फसली.