राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढल्याने गर्दी कमी करण्यासाठी पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू झाला आहे. पुढील तीन-चार दिवसांतील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन त्या दृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये राज्यात ५३,५१६ नव्या रुग्णांचे निदान झाले. हाच कल कायम राहिल्यास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या तीन दिवसांमध्ये प्रतिदिन १० हजारांपेक्षा अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला. मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. देशातील १८ हजार नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा समावेश आहे, याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

केंद्र सरकारनेही राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करून पथक पाठविले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली.  राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करणे योग्य होणार नाही; परंतु गर्दी रोखण्यासाठी काही तरी कठोर उपाय योजण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. सोमवारी अर्थसंकल्प सादर झाल्यावर बुधवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होईल. त्यानंतरच निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी राज्यात ८७,२२४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असता १०,१८७ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. हे प्रमाण ११.६८ टक्के  होते. फे ब्रुवारी महिन्यात एकू ण चाचण्या आणि करोनाबाधितांचे प्रमाण पाच ते सहा टक्के  होते. २८ फे ब्रुवारीपासून ते १० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.

सभा, समारंभावर बंदीची शक्यता

* गर्दी कशी टाळता येईल, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. सभा, समारंभांवर बंदी, हॉटेल्समधील गर्दी टाळणे, विवाहांचा हंगाम असला तरी उपस्थितांची संख्या कमी करणे असे काही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

* सध्या करोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंध लागू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे निर्बंध आणखी कठोर केले जातील, असेही संकेत आहेत.

राज्यात आणखी ११,१४१ जणांना संसर्ग

राज्यात गेल्या २४ तासांत ११,१४१ नवे रुग्ण आढळले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ९७ हजारांपेक्षा अधिक झाली. मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमधील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेले दोन दिवस राज्यात १० हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. गेल्या २४ तासांत ही संख्या ११ हजारांवर गेली.