ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी कायद्यात बसत असेल तर आरोपींविरूद्ध मोक्काही लावला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. विधानसभेत या प्रकरणी मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची ग्वाही दिली.
अतुल भातखळकर, तृप्ती सावंत, सदा सरवणकर, अनिल गोटे, अमित साटम, सुनील प्रभू, बच्चू कडू, डॉ. अनिल बोंडे, विनायकराव जाधव-पाटील, अबु आझमी यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, कायद्याच्या चौकटीत बसत असेल, तर आरोपींविरूद्ध मोक्का लावायला सरकार मागे पुढे पाहणार नाही. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आयुक्त आणि पोलीस सहआयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी त्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची काहीही गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल गोटे यांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध मोक्का लावणार का, असा उपप्रश्न विचारला होता. लक्षवेधीवरील चर्चेवेळी कोणत्या लोकप्रतिनिधीच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले, असाही उपप्रश्न विचारण्यात आला. त्यावरून सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. गोंधळ कमी झाल्यावर फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांचे नाव घेतले. पण त्यांच्याविरुद्ध सध्या कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेतील गोल्डन गॅंगच्या उल्लेखाला उत्तर देताना दोषी आढळणाऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.