अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना हलका चिमटा
एखादी गोष्ट आपल्या अधिकारात असेल तर त्याचा तडकाफडकी निकाल लावून टाकतो, उगीच निर्णय प्रलंबित  वा लांबवत ठेवण्याचा माझा स्वभाव नाही, असा ‘हलका चिमटा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काढला.
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त मंत्रालयात आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर अप्रत्यक्ष टीका केली. सत्काराला उत्तर देताना एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. नागपूर अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता मंत्रिमंडळाच्या बैठकीत लगेच कायद्याचा प्रस्ताव मांडला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यांनतर मंत्रिमंडळाच्या पाच बैठका झाल्या. परंतु त्या कायद्याचा प्रस्ताव आलाच नाही. अजितदादांनी तरी आता त्यात लक्ष घालावे, अशी विनंती देशमुख यांनी केली.
पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्याचे निमित्त करून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. माझ्या अधिकारात एखादी गोष्ट येत असेल तर मी त्याचा तडकाफडकी निकाल लावतो. एखादे काम होत नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगतो. परंतु उगाच निर्णय प्रलंबित ठेवणे मला आवडत नाही. आपला असा रोखठोक स्वभाव आहे, अशी कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणली.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांचेही भाषण झाले. वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर उपाध्यक्ष संजीव शिवडेकर यांनी आभार मानले.