स्थानिक संस्था करातून (एलबीटी) भाजीपाला, अन्नधान्य, कांदा-बटाटा, अन्नधान्य, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंना वगळले असले, तरी या सर्व वस्तूंच्या विक्रेत्यांनाही आंदोलनात सहभागी करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा उद्योग सध्या व्यापाऱ्यांच्या एका मोठय़ा गटाने सुरू केला आहे.
आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी एलबीटीमुळे भाज्या, डाळी, मासे महागणार असा चुकीचा प्रचार हा गट करीत आहे. या दडपेगिरीला रोखण्यात सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, सरकारने ठाणे, नवी मुंबईत एलबीटी लागू करताना त्यामधून वगळलेल्या सुमारे १५० वस्तूंची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात  कोणत्याही अन्नधान्याचा समावेश नाही. मात्र सुकामेव्यावर एलबीटी असल्याने ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांना मानणारा एपीएमसीमधील १०० व्यापाऱ्यांचा एक ताकदवान गट अस्वस्थ आहे. त्यामुळेच एलबीटीशी संबंध नसताना गेल्या दोन दिवसांपासून अन्नधान्य तसेच मसाल्याच्या घाऊक बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत.

पुस्तक विक्रीवर गदा
व्यापाऱ्यांनी आपल्या आंदोलनात अनेक भागांतील शैक्षणिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानांनाही सक्तीने ओढले आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक पुस्तकांचा एलबीटीशी काहीही संबंध नसताना हा प्रकार सुरू आहे. सध्या परीक्षांचा मोसम सुरू असताना पुस्तक दुकाने बंद पाडली गेल्याने विद्यार्थीही हवालदिल झाले आहेत.

एलबीटीमधून वगळण्यात आलेले पदार्थ :
गहू, तांदूळ, अन्नधान्य, डाळी, दूध, अंडी, भाजीपाला, कांदा, बटाटा, फळे, लसूण, आले, दही, ताक, पोहे, लाह्य़ा, चुरमुरे, शहाळे, हळद, मिरच्या, मीठ, सुंठ, मिरी, ब्रेड (पिझ्झा वगळून), मासे, कोंबडी, बकऱ्या, मेंढय़ा, डुक्कर, कोंबडय़ा, गाय, बैल, मासेमारीची जाळी, मत्सखाद्य, गुरांचे खाद्य, कोंबडय़ांचे खाद्य, ऊस, प्रथिनेजन्य पदार्थ, चरखा, हातमाग, खादीचे कपडे, गांधी टोपी, सौर उर्जेवर चालणारी यंत्रे, मातीचे दिवे, पणत्या, औषधे, कॅन्सर व एडस्वरील औषधे, कॉन्ट्रासेप्टिव्ह, मानवी रक्त, कुंकु, मटण, खत, टिकल्या, सिंदूर, राख्या, वर्तमानपत्रे, नीरा, काथा, लॉटरीची तिकिटे, झाड-फुलांची रोपे, फुले, तसेच राष्ट्रध्वज.