महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांतर्फे देण्यात आला आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास आणि गर्दी वाढत राहिल्यास करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील कोविड -१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी या लाटेच्या संकटाबद्दल माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या ही दुसर्‍या लाटेत नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा दुप्पट असण्याची शक्यता आहे. सक्रिय रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज असल्याचे असे डॉ. शशांक जोशी यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखातीत म्हटले आहे.

डेल्टा-प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तवली होती. त्यावर डॉ. जोशी म्हणाले, “दोन गोष्टी महत्त्वाच्या असतील, एक म्हणजे दुसरी लाट गेली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारात आहे. दिल्ली, मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये दररोज ५०० ते ६०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे अनेक लोक विनामास्क फिरत कोविड प्रोटोकॉलचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेची शक्यता जास्त असते.”

एक किंवा दोन महिन्यात महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे येऊ शकते करोनाची तिसरी लाट; आरोग्य विभागाचा इशारा

“दुसरी लाट दूर करण्यासाठी तीन स्तरांवर काम करावे लागले. दोन आठवड्यांसाठी पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी असावा. ७० टक्के नागरिकांचे लसीकरण करावे लागेल. यासाठी सुमारे चार ते पाच महिने लागतील. तोपर्यंच कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन न करण्यावर भर द्यायला हवा. लोकांनी आवश्यक मास्कचा वापर करायला हवा. मुंबईत लोक बाहेर पडत आहेत आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत आहेत. जर हे असेच चालू राहिले तर काळजी करण्याचे कारण आहे,” असे डॉ. जोशी म्हणाले.

दुसऱ्या लाटेत पाहिलेला डेल्टाचा प्रकार एक घातक व्हेरिएंट आहे आणि अत्यंत सहजरित्या संक्रमित होऊ शकतो. पावसाळ्याच्या वातावरणात गर्दीमुळे तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता आहे. आम्ही तसा इशारादेखील दिला आहे असे डॉ. जोशी यांनी सांगितले. २०२० मध्ये पहिल्या लाटेच्या कालावधीत महाराष्ट्रात ४ लाख रुग्णसंख्या नोंदली गेली, तर २०२१ मध्ये दुसर्‍या लाटेत ६ लाख रुग्णसंख्या होती. तिसऱ्या लाटेत अंदाजे ८  लाख रुग्णसंख्या असण्याची शक्यता असून त्यातील १० टक्के रुग्ण हे १८ वर्षाखालील असतील असे टास्क फोर्सने सांगितले होते. त्यामुळे तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असू शकते.

Covid 19: महाराष्ट्रात पुढच्या दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

“गणिताच्या मॉडेल्सनुसार तिसऱ्या लाटेचा अंदाज लावला जात आहे. कोविड एक तरंगणारा व्हायरस आहे आणि जी आकडेवारी समोर येते ती कधीही अचूक नसते. आमच्या अंदाजानुसार पेडियाट्रिक वेव्हची संभाव्यता कमी आहे. खालच्या-मध्यम-वर्गातील विषाणूमुळे मुलांवर जास्त परिणाम होणार नाही. परंतु २० ते ४० वयोगटामधील लोकांना जास्त धोका असू शकतो आणि ते निश्चित आहे. आता लोकांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे” असे डॉ. शशां जोशी यांनी सांगितले.

मुंबईत अनलॉक करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. ७० टक्के नागरिकांचे लसीकरण जो पर्यंत होत नाही तोपर्यत मुंबईत अनलॉक करणे योग्य ठरणार नाही असे डॉ. जोशी म्हणाले. लोकल सुरु करण्याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. आता अद्याप लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा विचार करू शकत नाही कारण आपण अद्याप धोक्याच्या बाहेर नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये केलेली चूक आपण पुन्हा पुन्हा करु नये असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.