News Flash

‘मातोश्री’च्या अंगणात यंदाही पाणी साचणार

पालिकेच्या दफ्तर दिरंगाईमुळे नाल्याच्या रुंदीकरणाला वेळीच मुहूर्त न मिळाल्यामुळमहापालिकेचा राज्यशकट हाकणाऱ्या ‘मातोश्री’च्या अंगणात यंदाही पाणी साचण्याची दाट शक्यता आहे.

नाल्याच्या रुंदीकरण कामाला अद्याप मुहूर्त नाही

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे परिसरातील कलानगर ते खेरवाडी दरम्यानच्या परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथील नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र पालिकेच्या दफ्तर दिरंगाईमुळे नाल्याच्या रुंदीकरणाला वेळीच मुहूर्त न मिळाल्यामुळे महापालिकेचा राज्यशकट हाकणाऱ्या ‘मातोश्री’च्या अंगणात यंदाही पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांना पावसाचे पाणी साचून त्रास होऊ नये या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात येतील, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

दरवर्षी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे परिसरातील कलानगर ते खेरवाडी परिसर जलमय होऊन नागरिकांना फटका बसतो. गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसात या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले आणि त्याचा फटका नागरिक आणि वाहतुकीला बसला होता. या परिसरातील पाणी कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शन ते नंदादीप कल्व्हर्ट दरम्यानच्या रस्त्यालगतच्या नाल्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिकेने सर्वेक्षणाअंती घेतला होता. या कामासाठी ‘एमएमआरडीए’कडून पालिकेला ‘ना हरकत’ देण्यात आली. त्यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल अशी अपेक्षा होती.

मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही या नाल्याच्या रुंदीकरणाला पालिकेला मुहूर्त सापडलेला नाही. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ‘ओएनजीसी’ ते खेरवाडी दरम्यान हा नाला वाहतो.

‘ओएनजीसी’जवळ या नाल्याची रुंदी आठ मीटर आहे. परंतु खेरवाडीपर्यंत पोहोचणाऱ्या या नाल्याची रुंदी २.५ ते ४ मीटर इतकी आहे. त्यामुळे नाल्यामध्ये पाणी कोंडी होऊन आसपासचा परिसर जलमय होतो. त्यामुळे या नाल्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता, असे पालिका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

पावसाचे पाणी न साचण्यासाठी प्रयत्न

या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याचा पालिकेचा मानस होता. मात्र या कामाला विलंब झाला असून पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे यंदा मुसळधार पाऊस पडल्यानंतर या परिसरात पाणी साचण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवाशांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात येतील. तसेच या परिसरातील साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही पालिका अधिकाऱ्याने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 2:13 am

Web Title: water logging matoshree kalanagar drainage issue bmc
Next Stories
1 सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता
2 सुरक्षित अन्न देणाऱ्या हॉटेलना मानांकन
3 वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आजपासून
Just Now!
X