मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता? असा प्रश्न राहुल गांधी यांनी गुरूवारी मुंबईतील काँग्रेस नेत्यांना विचारला. यावेळी राहुल गांधी यांनी मुंबईतील काँग्रेस नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याला गुरूवारी राहुल गांधी यांनी शिवडी कोर्टात हजेरी लावली होती. त्यानंतर मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची चांगली शाळा घेतली.

मुंबईमध्ये पाणी साठले होते त्यावेळी लोकांना मदतीची गरज होती त्यावेळी तुम्ही कुठे होतात? लोकांची मदत करणे आपलं काम आहे. पक्ष वाढवायचा असल्यास लोकांच्या मदतीला रस्त्यावर उतरले पाहिजे. जर तुम्ही त्यांची मदत केली नाहीत तर पक्ष कसा वाढेल असा प्रश्नही राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.

(आणखी वाचा : राहुल यांच्यावर आणखी एक खटला)

‘मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता? मुंबईकरांना मदत करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायला हवं होते. सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात द्यायला हवा होता. अशाने पक्ष कसा वाढेल, असे राहुल गांधी यांनी मुंबईतील ज्येष्ठ नेत्यांना झापले. ‘ मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरूपम, कृपाशंकर सिंग, नसीम खान, वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड आणि अमीन पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

राहुल शिवडी न्यायालयात येणार असल्याने मोठय़ा प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. ठरल्या वेळेत राहुल कडेकोट बंदोबस्तात न्यायालयाच्या आवारात दाखल झाले. त्यांना पाहताच राजीनामा मागे घ्या, अशा घोषणा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली.

(आणखी वाचा : आधीपेक्षा दसपट ताकदीने माझी लढाई लढणार-राहुल गांधी )

जेव्हा राहुल गांधी कोर्टाबाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या, रोजगार, तरूणांचे प्रश्न या विषयांवर लढाई सुरू राहणार असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच मागील पाच वर्षांमध्ये ज्या ताकदीने लढलो त्याच्या दसपट ताकदीने पुढची लढाई सुरू राहिल असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे अत्यंत आक्रमकपणे बोलत होते. ते जेव्हा मुंबई विमानतळावर आले तेव्हा राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. माझी लढाई ही विचारांची लढाई आहे. ही लढाई मी यापुढेही लढत राहणार. अधिक तीव्र करणार असेही राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच ट्विट प्रकरणात मी दोषी नाही असे त्यांनी कोर्टात सांगितले.