मुंबई : केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनी विविध केंद्रीय आणि राज्य दलातील एकूण ९५४ पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली आहेत. देशभरातील २३० जवानांना पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकाचाही समावेश करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षांतून दोनदा ही पदके जाहीर केली जातात. महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना पदके जाहीर झाली असून त्यातील ३ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर, ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी,मुंबई) आदींना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. सीआरएफ अधिकारी लौक्राकपम इबोमचा सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या सेवेतील हे दुसरे शौर्य पदक आहे. याव्यतिरिक्त विशेष सेवेसाठी ८२ राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी ६४२ पोलीस पदके देण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि शौर्य पोलीस पदक ही दोन्ही पदके जीवन आणि मालमत्ता वाचविणे, गुन्हेगारी रोखणे किंवा गुन्हेगारांना पकडणे यातील विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केली जातात. पोलीस सेवेतील विशिष्ट विक्रमासाठी राष्ट्रपती पोलीस पदक दिले जाते. तसेच गुणवान सेवेसाठी पोलीस पदक साधनसंपत्ती आणि कर्तव्याची निष्ठेद्वारे वैशिष्टय़कृत मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते.