लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची तयारी सुरु असतानाच आता नागपूर मंडळानेही सोडत काढण्याची तयारी सुरु केली आहे. नागपूरमधील अंदाजे ७०० घरांसाठी दिवाळीदरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे.

नव्या संगणकीय सोडत प्रणालीमुळे सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया राबविणे म्हाडासाठी सोपे झाले आहे. त्यामुळेच या वर्षात आतापर्यंत मुंबई मंडळ (४०८२), कोकण मंडळ (४६५४), पुणे मंडळ (६०५८) आणि औरंगाबाद मंडळातील (९३६ ) घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. एकूणच आतापर्यंत १५ हजारांहुन अधिक घरांची सोडत काढण्यात आली आहे. आता कोकण मंडळाकडून अंदाजे पाऊणे पाच हजार, पुणे मंडळाकडून अंदाजे पाच हजार तर औरंगाबाद मंडळाकडून ६०० घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची तयारी सुरु आहे. नागपूर मंडळानेही सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी दिली. नागपूरमधील गणेशपेठ या मध्यवर्ती परिसरात एक हजार घरांची निर्मिती सध्या नागपूर मंडळाकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पातील ३०० घरांसह अन्य काही घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. अंदाजे ७०० घरांचा त्यात समावेश असून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटासाठी घरे असतील. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये जाहिरात तर डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येईल असेही मेघमाळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांकडे २१५ कोटींचा दंड थकीत; वाहतूक पोलिसांच्या वसुली मोहिमा अयशस्वी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याच्या पाच हजार घरांच्या सोडतीसाठी उद्या जाहिरात?

पुणे मंडळाने पुणे, आंबेजोगाई, लातूर आणि इतर ठिकाणच्या पाच हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार होती. पण काही तांत्रिक कारणाने ती लांबली आहे. मात्र आता जाहिरातीची प्रतीक्षा संपणार असून उद्या, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आज, सोमवारी सायंकाळी याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. उद्या जाहिरात प्रसिद्ध होऊ शकली नाही तरी या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे पुणे मंडळाचे नियोजन आहे. या वृत्ताला पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दुजोरा दिला.