अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर महिन्याभरासाठी सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीवीपी)च्या कार्यकर्त्यांनी संजय दत्तच्या मुंबईतील वांद्रे येथील बंगल्याबाहेर निदर्शने केली.
एबीव्हीपीच्या जवळपास दहा-पंधरा कार्यकर्त्यांनी संजय दत्तच्या बंगल्याबाहेर त्याची पॅरोलवर सुटका झाल्याच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘संजय दत्त तु ने क्या किया? देश का नाम बदनाम किया’ अशी जोरदार नारेबाजी एबीव्हीपी कार्य़कर्त्यांनी केली.
पत्नी मान्यताची प्रकती ठीक नसल्याच्या कारणावरून संजय दत्तने सुट्टीचा अर्ज केला होता. यावर त्याला ३० दिवसांची सुटी म्हणजेच पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काय झाले, हे कळण्याआधीच संजय दत्त तुरुंगाबाहेर पडला. सध्या संजय दत्त त्याच्या वांद्र्यातील निवासस्थानी आहे.