मुंबई : मुंबईतील मनोरंजन मैदान व क्रीडांगणे दत्तक तत्वावर खासगी संस्थांना देऊ नयेत, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि अंधेरीचे (पश्चिम) आमदार अमित साटम यांनी केली आहे. साटम यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे. शहरातील झपाट्याने कमी होत असलेल्या मोकळ्या जागांचे रक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने आणलेले तात्पुरते धोरण स्थगित करावे अशीही मागणी साटम यांनी केली आहे. मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी जाहिरातींच्या माध्यमातून महसूल उभारावा, असे आवाहनही आमदार साटम यांनी महापालिकेला केले आहे.
मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी धोरण तयार केले होते. या धोरणानुसार अकरा महिन्याच्या कालावधीसाठी मोकळ्या जागा या खासगी संस्था, न्यास यांना देखभालीसाठी दिल्या जातात. मात्र देखभालीसाठी दिलेल्या मोकळ्या जागांबाबत नेहमी चिंता व्यक्त केली जाते. या जागा हडपल्या जाण्याची भीती आहे.
काही मोकळ्या जागांचे नफा कमावण्यासाठी क्लब किंवा जिमखान्यात कायमचे रूपांतर केले जाऊ शकते. त्यामुळे मोकळ्या जागांसाठी पालिकेकडे व्यापक धोरण नसल्याची बाब अधोरेखीत करून आमदार अमीत साटम यांनी हे धोरण स्थगित करण्याची मागणी केली आहे. नवीन नागरिक-अनुकूल धोरण तयार होईपर्यंत सध्याच्या ११ महिन्यांच्या तात्पुरत्या धोरणांतर्गत कोणत्याही नवीन मोकळ्या जागांचे वाटप करु नये, असे आवाहन आमदार अमीत साटम यांनी पालिका प्रशासनाला केले आहे.
पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात साटम यांनी म्हटले आहे की, मोकळ्या जागा देखभालीचे धोरण बनवताना प्रशासनाने सार्वजनिक भावना लक्षात घेतल्या नाहीत, परिणामी धोरणाला तीव्र विरोध झाला. सर्व मोकळ्या जागांची देखभाल पालिकेनेच करावी. त्या खाजगी पक्ष, ट्रस्ट, संघटना किंवा संस्थेला देऊ नयेत. या मोकळ्या जागांमध्ये जाहिराती नियंत्रित करून देखभालीसाठी पालिका महसूल निर्माण करण्याची सूचनाही त्यांनी केली. अंधेरी (पश्चिम) या आपल्या विधानसभा मतदारसंघात ६० हून अधिक मोकळ्या जागांचा विकास करण्यात आला असून त्या सर्व जागांची देखभाल महापालिका करत असल्याचेही साटम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
एखाद्या ट्रस्टने किंवा खाजगी पक्षाने जागा ताब्यात घेतली की, त्यांना बाहेर काढणे कठीण होते. काही ट्रस्ट धोरण अंतिम होण्यापूर्वी ११ महिन्यांच्या धोरणाअंतर्गत हितसंबंधांसह अर्ज करत आहेत. या संस्थाना शहरातील एकही मोकळी जागा दिली जाणार नाही, याची खात्री पालिका प्रशासनाने करावी. सर्व मोकळ्या जागा पालिकेने स्वत:कडे राखल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, यापूर्वी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना दत्तक तत्त्वावर देण्यात आलेल्या जागांवर जिमखाने किंवा इतर बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी लोकांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यात शिवसेना व भाजपच्याही लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे, हे उघड गुपित आहे. अशा सुमारे २६ मोकळ्या जागा विविध संस्था व लोकप्रतिनिधींकडे अद्याप आहेत. मात्र पालिकेच्या धोरणाला भाजपने वारंवार विरोध केला होता. मात्र प्रशासनाने या धोरणाची नेहमीच पाठराखण केली होती.