मुंबई : कांदिवलीतील डान्सबारवरील कारवाईवरून विरोधकांकडून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर खेडमधील अवैध वाळू उपशासंदर्भातही योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून ते तपासून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असणारा ‘सावली’ डान्सबार आणि खेडमधील नदीतील अवैध वाळू उपशावरून त्यांना लक्ष्य केले होते. यासंदर्भात ॲड. परब यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना आरोपांसंदर्भातील सर्व कागदपत्रे दिली दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्सबार चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे. या डान्सबारवर आतापर्यत झालेल्या कारवाईचा पंचनामा, प्रथम माहिती अहवालाची प्रत, डान्सबारचा परवाना, डान्सबारचे कायदे याचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. हा बार दुसऱ्या व्यक्तीला चावायला दिला असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कायद्यानुसार, डान्सबारसंबंधी कोणत्याही गैरप्रकारांची जबाबदारी ही मूळ मालकावरच येते, असे परब म्हणाले.
त्याचप्रमाणे खेडमधील नदीतून अवैध वाळू उपसा करून ती योगिता डेंटल कॉलेजमध्ये साठवून ठेवली आहे. अंकित मुकादम नावाचा कार्यकर्ता वाळू उपसा सहभागी असल्याचा दावा करत त्याचे व्हिडिओ, फोटोही दिले असल्याचे परब यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा थांबवून गुन्हा दाखल केला आहे. या सर्व गोष्टींचे पुरावे दिले असून मुख्यमंत्र्यांनी पुरावे तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याचे परब यांनी सांगितले.