मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे माझी भाजपमध्ये छळवणूक झाली आणि पक्ष सोडावा लागला, अशी खंत माजी मंत्री अण्णा डांगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अतिशय परखडपणे आपली व्यथा मांडली. मी २३ मार्च २००२ रोजी भाजपचा राजीनामा दिला. ज्या व्यक्ती आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल बरेवाईट बोलणे बरे नाही. पण त्यावेळी पक्षात चुरस निर्माण झाली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांचे उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
तेव्हा त्यांनी सांगितलेल्या तीन-चार नावांमध्ये ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे नाव होते. त्यामुळे आता आपण पंतप्रधान होणार आणि मेहुणे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे महाजन यांच्या डोक्यात शिरले. तेथून माझ्या छळवादाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार आल्यावर माझ्याकडे साधे खाते देण्यात आले होते. पण त्या खात्यात मी जे निर्णय घेतले, त्याची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आणि त्यांनी माझ्याकडे ८-९ खात्यांचा कार्यभार सोपविला. मला राज्यात काम करण्याची संधी दिली आणि सुमारे १५ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी असलेले जलसंधारण खाते सोपविले आणि महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची जबाबदारी दिली, असे डांगे यांनी सांगितले.
बाळासाहेबांनी माझ्यावर प्रेम केले, पण तेच मला नडले. बाळासाहेब माझ्या नावाचा पुढे वेगळा विचार करतील. पक्षातून माझ्याबद्दल सूचना आली, तर ती उचलून धरतील, अशी शक्यता मुंडे-महाजनांना वाटली. गोपीनाथ मुंडे व मी जिवाभावाचे व एकमेकांच्या सुखदु:खात सामील होणारे मित्र होतो. पण नाईलाजाने पक्ष सोडावा लागला, अशी खंत डांगे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २३ वर्षे प्रचंड काम केले. पण त्याची दखल घेतली गेली नाही. मला पदाची अपेक्षा नव्हती. पण डांगे यांचे काय करणार, असा प्रश्न अध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता ‘आता त्यांच्यामागे कार्यकर्ते नाहीत, ताकद नाही, ’ असे उद्गार पवार यांनी काढले. त्यांचे वक्तव्य अंत:करणाला भिडले व मी पक्षात निष्क्रिय झालो. आता मला भाजपमध्ये सांभाळून घ्यावे, अशी अपेक्षा डांगे यांनी व्यक्त केली. डांगे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
‘जनसंघाच्या आणि भाजपच्या वाढीत मोलाचा वाटा असणा-या शीर्षस्थ नेत्यांमधील एक नेता, ’ अशा शब्दांत फडणवीस यांनी डांगे यांच्या कार्याचे कौतुक केले. डांगे यांची घरवापसी ही आनंदाची बाब असून आम्ही तुम्हाला सांभाळून घेण्याएवजी ज्येष्ठ या नात्याने तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्यावे, असे फडणवीस यांनी नमूद केले. डांगे यांनी पक्ष सोडला, तरी पक्षाच्या मूलभूत विचारांवर टीका केली नाही. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या शब्दाला भाजपमध्ये सदैव मान देण्यात आला होता, तोच मानसन्मान पुन्हा मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. दुर्दैवाने काही गैरसमजापोटी अण्णा डांगे भाजप सोडून गेल्यानंतर प्रत्येक नेत्याला हळहळ वाटली होती, असे फडणवीस यांनी नमूद केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा तीव्र निषेध
‘ऑपरेशन सिंदूर’ या देशाला अभिमान वाटणा-या मोहीमेला ‘माध्यमांवरील सरकारचा तमाशा’ म्हणणा-या काँग्रेसच्या हीन प्रवृत्तीचा मी निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर बाबत पुराव्यानिशी विस्तृतपणे सत्य आणि वास्तव समोर मांडल्यानंतर काँग्रेस पूर्णपणे उघडी पडली आहे. काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी टीका फडणवीस यांनी काँग्रेस खासदार प्रणोती शिंदे यांच्यावर केली. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे म्हणजे या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वेदनेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दैदिप्यमान कामगीरी करत पाकिस्तानच्या दहशतवादाला पायबंद घालणा-या भारतीय सेनेचा हा अपमान आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.