मुंबई : यंदा मात्र सहा फुटांखालील गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे लागणार आहे. त्यामुळे यंदा जवळपास सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा कृत्रिम तलावातच होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी २०४ कृत्रिम तलाव होते, तर यंदा कृत्रिम तलावांची संख्या २५० हून अधिक असेल. तसेच नैसर्गिक विसर्जन स्थळावरही कृत्रिम तलाव तयार केले जाणार असून गिरगाव चौपाटीवर एकूण पाच कृत्रिम तलाव केले जाणार आहेत.
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. पीओपीच्या मूर्तीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यामुळे मुर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा फूटांच्या आतील सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदा मुंबई महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी २०४ कृत्रिम तलाव तयार होते. यंदा ही संख्या २५० हून जास्त असेल, अशी माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.
कृत्रिम तलावांची संख्या किती असावी याबाबत सर्व विभागातील सहाय्यक आयुक्तांना आढावा घेऊन जागा निवडून संख्या कळवण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार सुमारे २५० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्ती मुंबई महापालिकेने नेमलेल्या स्वयंसेवकांच्या हातीच सोपवाव्या लागणार आहेत. त्यानंतर त्याचे विसर्जन केले जाणार आहे. दरवर्षी पाच फूट खोल कृत्रिम तलाव तयार केले जातात. यंदा या तलावांची खोली सहा फूटांपर्यंत असेल. तसेच यंदा जास्त मूर्ती असतील. त्यामुळे सतत तलावातील मूर्ती काढून ठेवण्याची व पाणी बदलण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गिरगाव चौपाटीवर पाच कृत्रिम तलाव
गिरगाव चौपाटी ही मुंबईतील सर्वात मोठी चौपाटी असून या ठिकाणी दरवर्षी जास्तीतजास्त गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. यंदा गिरगाव चौपाटीवरही पाच कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. गिरगाव चौपाटीवर अनेकदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर लहान मूर्तीदेखील विसर्जनासाठी येतात. या मूर्तीच्या विसर्जनासाठी सोय करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी २४ तासांच्या आत मूर्ती बाहेर काढाव्यात व पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्ती पुनर्प्रक्रियेसाठी बंद वाहनातून पाठवल्या जाणार आहेत. डायघर, शिळफाटा येथे वाहतूक करण्यासाठी दर निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यानुसार या मूर्ती नेल्या जाणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.