मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून महाराष्ट्रातील गल्लोगल्ली आणि घरोघरी तयारीची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतील विविध मंडळे आणि कोकणातील घरोघरी भजनांचा नाद कानावर पडत असतो. गेली काही वर्षे आपल्या नोकऱ्या, व्यवसाय सांभाळून तरुणांची भजनी मंडळे सुरू करण्याकडे कल आहे. मात्र, वाद्यानिर्मिती, वाद्यांची बांधणी याकडे तरुणाई वळली नसल्याने कारागीर मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सवातील भजने ही स्वरवाद्या व तालवाद्यांच्या साथीने उत्तरोत्तर रंगत जातात. या भजनांना व आरत्यांना ढोलकी, ढोलक, मृदुंग, पखवाज तबला, टाळ, झांजा इतर महत्त्वाच्या वाद्यांची साथ मिळते. पंढरपूरच्या आषाढी वारीपासून विविध वाद्यांसाठी वाढती मागणी लक्षात घेऊन जानेवारीपासून वाद्यानिर्मितीस सुरुवात होते. जूनपासून या कामाला वेग येतो आणि वाद्यांची विक्री व दुरुस्ती करणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते.

हेही वाचा…‘न्यूरोइम्युनोलॉजी’ रुग्णसंख्येत वाढ, नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग वरदान

अलिकडे वारीला जाणाऱ्या तरूणांची संख्या वाढते आहे. गणेशोत्सवापूर्वी या वाद्यांसाठीची मागणी वाढते. प्रामुख्याने भजनी मंडळे या वाद्यांची खरेदी करतात. त्याचप्रमाणे पारंपरिक लोककलांमध्ये या वाद्यांचा वापर केला जातो.

ज्याप्रमाणे पारंपरिक वाद्य वाजविण्यासाठी रियाज महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे वाद्यानिर्मितीच्या कामातही प्रचंड मेहनत आणि एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार वाद्यानिर्मितीच्या कामात काही बदलही झाले आहेत. वाद्याचे लाकूड सुकविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी द्यावा लागतो. त्यानंतर महिनाभर लाकूड पॉलिश केले जाते. शाई भरायलाच आठ तास लागतात. त्यामुळे या कामात मेहनत खूप आहे. हे काम शिकण्यासाठी व्यवस्थित लक्ष केंद्रित करून वेळ द्यावा लागतो. परंतु सध्याची पिढी वाद्यानिर्मितीच्या कामाकडे सहसा वळत नाही. कोकणपट्टयातील सर्वाधिक लोक वाद्यानिर्मितीमध्ये कार्यरत आहेत. तसेच बदलत्या काळानुसार कारागीरांचे मानधनही वाढले, परिणामी वाद्यांचे भावही वाढले आहेत’, अशी माहिती वाद्यानिर्मिती करणाऱ्या लालबागमधील ‘दामोदरदास गोवर्धनदास’ या दुकानातील मेहुल चौहान यांनी दिली.

हेही वाचा…चेंबूरमधील पुनर्विकास प्रकल्प: कथित फसवणूकप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

वाद्यांची शान कायम…

पारंपरिक वाद्य वाजविण्याकडे तरुण पिढीचा ओढा आजही कायम आहे. हल्ली वाद्यानिर्मितीसाठी फायबरचा वापर केला जातो. परंतु फायबर हे ढोल – ताशांपुरते योग्य आहे. इतर चर्मवाद्यांमध्ये फायबरचा वापर करणे योग्य नाही, असे कारागीरांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रातील कोकण, सोलापूर, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून कारागीर येतात. परंतु नवीन पिढी वाद्यानिर्मिती कारागीर व्हायला तयार होत नसल्याची खंत वाद्यानिर्मितीकारंनी व्यक्त केली.

लघुउद्योग नेहमीच दुर्लक्षित

‘वाद्यानिर्मितीचे काम हे तंत्रशुद्ध आणि शारीरिक मेहनतीचे आहे. वाद्यानिर्मितीचे शिक्षण हे अनुभवातून मिळते आणि एक परिपूर्ण कारागीर तयार होण्यासाठी किमान दोन वर्षे लागतात. महाराष्ट्रात वाद्यनिर्मिती करणारे कारागीर खूप कमी आहेत. सध्या महाराष्ट्रातील कोकण, सोलापूर, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमधून कारागीर येतात. परंतु नवीन पिढी वाद्यानिर्मिती कारागीर व्हायला तयार होत नाही. हा एक पारंपरिक लघुउद्याोग असून याकडे नेहमीच दुर्लक्ष राहिला आहे, असे चिंचपोकळीमधील ‘मानिकलाल खिमजी राजपूत’ या दुकानातील अतुल राजपूत यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई : हत्या प्रकरणातील आरोपीला हैदराबाद येथून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाकडाचा तुटवडा

तालवाद्यांसाठी कडूलिंब, आंबा, शिसव, खैर, शिवण आणि चाफ्याच्या झाडाचे लाकूड वापरले जायचे. मात्र आता ही लाकडे सहसा मिळत नाहीत. सध्या महोगनी या लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ते आसामवरून येते. वाद्यानिर्मितीसाठी उत्तम दर्जाच्या लाकडाचा वापर करणे महत्वाचे असते. अलिकडच्या काळात या लाकडाचा तुटवडा काही प्रमाणात जाणवत आहे.