‘बारोंडागड’ इतके खडबडीत नाव असलेले एखादे ठिकाण मला त्याच्या इतके प्रेमात पाडेल यावर तिथे जाईस्तो मी स्वत:ही विश्वास ठेवला नसता. मुळात असे एखादे ठिकाण अस्तित्वात आहे, याचाच पत्ता मला नव्हता. एक सुप्रसिद्ध ठिकाण हाकेच्या अंतरावर असूनही बारोंडागड मात्र लोकांच्या नजरांपासून सुरक्षित राहिले आहे. ते झाकले माणिक आहे आणि या ठिकाणाची सफर घडवण्याआधी मला आपल्याला मनापासून एक विनंती करायची आहे की, या आणि अशा निरामय स्थानाचे सौंदर्य आपल्या निष्काळजीपणाने, बेछूट वागण्याने चुकूनही डागाळले जाऊ नये, अशी शपथ घेऊनच पुढे पाऊल टाकू या.
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाच्या पूर्वेकडून फुलपाडा स्टॉपसाठी नियमित बस व रिक्षा येतात. महापालिकेच्या तरणतलावापाशी हा स्टॉप आहे. खासगी रिक्षा तुम्हाला थेट गडाच्या पायथ्यापर्यंत नेऊ शकतात. तरणतलाव येईपर्यंत आपण खूप गजबजलेल्या आणि काहीशा बकाल वातावरणातून येतो. आजूबाजूला अगदी फिरती शौचालये दिसणाऱ्या या भागातून जाताना जवळच एक निसर्गसौंदर्याचा ठेवा आपली वाट बघतो आहे याची पुसटशी कल्पनाही येत नाही. सिमेंटच्या तीस-पस्तीस पायऱ्या चढून गेल्यावर फाटक्यातुटक्या झोपडीतून एकदम सिंड्रेला बाहेर यावी तसे वाटते. बिलोरी आईन्यात जणू चंद्राचे प्रतिबिंब दिसावे तसा नितळ पाण्याचा विस्तृत संचय दिसतो. तिन्ही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांच्या कोंदणात बसवलेला हिराच जणू! हे आहे पापडखिंड.. गमतीशीर नाव आहे ना? तलावाच्या कडेने केलेल्या फुटपाथसारख्या मार्गावरून तुम्ही रमतगमत फिरू शकता वा काठावर बसूही शकता. पूर्ण तलावाच्या सभोवती जाणारी वाट आहे. डाव्या हाताला सुप्रसिद्ध जीवदानी मातेचे मंदिर आहे. उजव्या दिशेने चालत गेलात, की सुबाभूळ साग या झाडांची दाटी जंगलात आल्याचा आनंद देते. हा झाला आपल्या सफरीचा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यात आपण घोडेस्वारी केल्याचा आनंद रिक्षात बसूनही घेऊ शकू, असा खडकाळ वर जाणारा कच्चा रस्ता आहे. आजूबाजूला तुरळक आदिवासींची घरे आणि शेती आहे. मी या टप्प्यावर पोहोचले, तेव्हा दिवस मावळला होता. ताडाची झाडे, बोरीची काटेरी झुडपे आणि सागवानाचे उंच वृक्ष त्या वाटेच्या कडेने शांत उभे होते. एका गजबजलेल्या शहराच्या कुशीत हे घनदाट जंगल आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. हिरव्या झाडाझुडपांचा मरवा किंवा दवणा या सुगंधित वनस्पतींसारखा विवक्षित गंध नाकाला जाणवत होता. आपण जंगलाच्या गाभ्यात चालल्याची ती सुखद जाणीव होती.
रिक्षा थांबली. जीवदानीच्या तेराशेहून अधिक पायऱ्या फक्त तीन मिनिटात चढणारा चाळिशीचा ‘तरुण’ नागेश रिक्शावाला आज माझा वाटाडय़ा होता. त्याच्यासाठी बारोंडागडाच्या ३५० पायऱ्या चढणे पोरखेळ होता आणि माझ्यासाठी एव्हरेस्टवर चढाई! लाल चिरे आणि सिमेंटच्या पायऱ्या चढताना सागाच्या जाळीदार पानांआडून डोकावणारा चंद्र मला नि:शब्द सोबत करत होता आणि रातकिडे मात्र हरिनामाचा गजर करत होते. हिरवट प्रकाशाचे काजवे मधूनच तरळत जात होते आणि आधी दिवसाउजेडी पोहोचले नाही म्हणून हळहळणारी मी, हे रात्रीचे दुर्मीळ सौंदर्य बघायला मिळाले म्हणून धन्य झाले. या पायऱ्यांच्या कडेने मोठमोठय़ा शिळा आहेत. पावसाळ्यात त्यावरून धबधबा वाहताना काय दृश्य दिसत असेल याची कल्पना मी करत होते. अर्धा रस्ता गेल्यावर एक चिमुकले बारमाही पाणी असलेले कुंड आहे. तिथे संगमरवरी सुबक घुमटीत गणेश, शिव, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. शेवटचा टप्पा थोडा दमछाक करणारा असला तरी बारोंडादेवीचे मंदिर आता धीर देत असते. धापा टाकत त्या पायऱ्या चढले आणि मला बाकीच्या जगाचा, दैनंदिन तणाव-चिंतांनी करपलेल्या आयुष्याचा साफ विसर पडला. घामेजलेल्या देहाला थंड झुळूक लपेटून गेली आणि मनाला चंदनी उटी लागली. दूर खाली पापडखिंड तलावाचे पाणी चंद्रप्रकाशात चमकत होते. त्याही पलीकडे विरार शहराचे झगमगते दिवे आता अंगावर न येता दिवाळीतल्या पणत्यांसारखे शांत आनंद देत होते. हातपाय धुवून दगडांच्या नैसर्गिक कपारीत प्रतिष्ठित देवीचे दर्शन घेतले. जीवदानी माता, बारोंडा माता यांच्या सुरेख मूर्ती मन प्रसन्न करतात. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आणि शितळादेवी यांचे तांदळा स्वरूपात दर्शन होते. इथे हार-प्रसादाची दुकाने नसल्याने पूजेच्या वेळी देवीला घातलेला ताज्या फुलांचा एकमेव टवटवीत हार मनाला शांतता देतो. इथे भक्तांची वर्दळ नसली तरी, खूप चैतन्यमय ऊर्जेचे तरंग जाणवतात.
थकलेल्या पायांमध्ये त्राण आल्यावर अजून उंच पायऱ्या चढून वर गेले. इथे कालभैरव आणि कालीचे स्थान आहे. एवढय़ा उंचीवरून आता जीवदानीच्या मंदिराचे मनोहर दर्शन होते. नीरव शांतता डोळे उघडे असूनही ध्यानसमाधीचा अनुभव देते. पुन्हा खाली देवळात येऊन साडेसातची आरती अनुभवली. परतीचा प्रवास टिपूर चांदण्यात झाला. पावले परतली पण मन परतलेच नाही.
कसे जाल?
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाच्या पूर्वेकडून फुलपाडा स्टॉपसाठी नियमित बस व रिक्षा येतात. महापालिकेच्या तरणतलावापाशी हा स्टॉप आहे. खासगी रिक्षा तुम्हाला थेट गडाच्या पायथ्यापर्यंत नेऊ शकतात.