सुहास जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाबाधिताच्या मृतदेहास मंत्राग्नी देणे शक्य नसल्याने धर्मशास्त्रातील फारशा न वापरला जाणाऱ्या ‘पालाश’ विधीचा वापर गेल्या महिन्याभरात वाढला आहे. तसेच या विधीकरिता बऱ्यापैकी दक्षिणा मिळत असल्याने अन्य धार्मिक कार्ये करणारे भटजीही आता दशक्रिया विधीकडे वळू लागले आहेत.

करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी करोनाबाधित मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अनेकदा जवळचे नातेवाईकही बाधित असल्यास अंत्यविधीस उपस्थित नसतात. त्यामुळे दहाव्या दिवसाच्या आधी ‘पालाश’ विधीच्या आधारे मंत्राग्नी देणे आणि जीवखडा घेण्याच्या विधीचे प्रमाण सध्या वाढू लागले आहे. या विधीकरिता तुलनेने अधिक दक्षिणा घेतली जात आहे.

टाळेबंदीच्या काळात सर्वच व्यवहार बंद असताना धार्मिक कार्येही थांबली. त्यामुळे त्यावर उपजीविका करणाऱ्या भटजींपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. परंतु आता शिथिलिकरणात काही ठिकाणी दशक्रिया विधी सुरू झाले आहेत. इतर धार्मिक कार्ये करणारे मुंबई आणि महानगर परिसरातील काही भटजी या विधींकडे वळू लागल्याचे, दशक्रिया विधी करणाऱ्या काही भटजींनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. अर्थात त्यांना पुन्हा मूळ धार्मिक कार्याकडे जायचे असल्यास तशी सोय धर्मशास्त्रात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दशक्रिया विधीकडे वळणाऱ्यांची संख्या फार मोठी नसली तरी सध्या तसा कल दिसत असल्याचेही भटजींनी सांगितले.

गेल्या तीन-चार दिवसांत ठाण्यातील कोलशेत येथील जुन्या स्मशानभूमीवर असे विधी होताना दिसत आहेत. त्याच ठिकाणी केशवपन आणि इतर आनुषंगिक कर्मकांडे केली जात आहेत.

गेल्या काही वर्षांत अनेक पूजा, संकल्प वगैरे बाबी ऑनलाइनच्या माध्यमातून करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र दशक्रिया विधीसाठी अद्याप ऑनलाइन माध्यमाचा वापर तितकासा सोयीस्कर नसल्याचे मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि नाशिक येथील भटजींनी सांगितले.

खर्चात ५ हजारांची वाढ! वाहतुकीच्या मर्यादित सुविधा, इतर निर्बंध आणि करोना संसर्गाचा धोका यामुळे मुंबई आणि महानगर परिसरात भटजी मिळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर दशक्रिया विधीच्या खर्चातही काही भटजींनी पाच हजार रुपयांची वाढ केल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वसाधारणपणे जास्तीतजास्त १५ हजारांत होणाऱ्या विधीसाठी सध्या २० हजार घेतले जात आहेत.

‘पालाश’ विधी म्हणजे..

एखाद्या व्यक्तीचा युद्धात मृत्यू झाला, मगरीने अथवा वाघाने हल्ला केल्याने किंवा परागंदा होऊन मृत्यू झाला तर अशा व्यक्तीच्या दशक्रियेपूर्वी ‘पालाश’ विधी केला जात असे. जेव्हा मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करणे शक्य नसते तेव्हा तांदळाच्या पीठापासून किंवा काही ठिकाणी पळसाच्या काडय़ांपासून मानवी आकृती तयार केली जाते. या आकृतीवर अंत्यविधीचे सर्व सोपस्कार केले जातात. त्यानंतर दिवसकार्य पार पाडले जाते. अग्निसंस्कार केल्याचे मानसिक समाधान हीच यामागील भावना असल्याचे भटजींनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhatji who performs other religious duties also attends the dasakriya ritual abn
First published on: 18-07-2020 at 00:22 IST