मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक मागील तीन वर्षांपासून न झाल्याने प्रशासकाकडून कारभार हाकला जात आहे. यामुळे महापालिका कारभारात मोठ्या प्रमाणावर अनागाेंदी माजली असून १५६ अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या १२२ तसेच अन्य ३४ अभियंत्यांच्या बदली आणि बढतीत अनियमतात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री फडवीस यांनी या बदली आदेशांना स्थगिती देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. १५६ अभियंत्यांच्या बदलीला स्थगिती देण्याची नामुष्की मुंबई महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. या अनियमिततेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेमधील अभियंता हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून पदासाठी पात्र असूनही त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे. नगर अभियंता विभागामार्फत पदोन्नती व भरती प्रक्रिया राबवल्या जात नसून अभियंत्यांकडून अतिरिक्त कामे करून घेतली जातात. या अतिरिक्त कामांच्या ताणामुळे महापालिकेच्या विकासकामांची गुणवत्ता ढासळली आहे. अधिकाऱ्यांवर ताण येत असल्याने शारीरिक व मानसिक तणाव वाढत असल्याचे प्रभू यांनी या पत्रात म्हटले आहे.

६७७ अभियंत्यांची पदे रिक्त

मुंबई महापालिकेत प्रमुख अभियंता ५, उपप्रमुख अभियंता २४, कार्यकारी अभियंता १५०, सहाय्यक अभियंता २००, दुय्यम अभियंता पदातील ३०० पदे रिक्त आहेत. मात्र ती भरली जात नाहीत. यासाठी गट अ ची परीक्षाही घेण्यात आली, मात्र पेपर फुटीमुळे परीक्षा प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. त्याचप्रमाणे बदली, बढतीतील अनियमिततेमुळेही या प्रक्रियेला स्थिगती मिळाली असून या प्रकरणी दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे.

मात्र चौकशी पूर्ण होऊनही कारवाई होत नाही तोपर्यंत अंतरिम कालावधी करिता प्रमुख अभितयंता (विकास नियोजन)च्या धर्तीवर नगर अभियंता व संचालक यांनादेखील महापालिका आयुक्तांच्या सरक्ष अखत्यारित आणावे. जेणेकरून चौकशी प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, अशी मागणीही सुनील प्रभू यांनी केली. पदोन्नती आणि बदली घोटाळ्यात झालेल्या गैर प्रकारांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय असल्याने याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाची मागणी करणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.