मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणी येत आहेत. असे असतानाच महापालिकेच्या एस विभगातील पासपोली मनपा मराठी शाळा क्रमांक २ शिक्षकांअभावी बंद करण्यात आली आहे. संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी शाळा क्रमांक १ मध्ये स्थलांतरित करण्यात अले असून मराठी शाळा क्रमांक १ ची पटसंख्या वाढली आहे.
परिणामी, मराठी शाळा क्रमांक १ मधील वर्गात विद्यार्थ्यांना पुरेशी जागा नसल्याने पासपोली शाळा क्रमांक २ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, बंद करण्यात आलेल्या शाळा क्रमांक २ मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिशुवर्ग घेण्यात येत असल्याचा दावा परिषदेने केला आहे. पासपोली मनपा मराठी शाळा क्र. २ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये ९१ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र त्यांना शिकवायला केवळ एकच कायमस्वरूपी शिक्षिका होत्या. मागील अनेक वर्षांपासून शाळेत कंत्राटी शिक्षक अधूनमधून येत होते. मात्र, २७० दिवसांच्या कालावधीनंतर ते पुन्हा जात असत. त्यामुळे पालकांकडूनही अनेक तक्रारी केल्या जात होत्या. या शाळेत ऑक्टोबर २०२४ मध्ये एका शिक्षण सेविकेला कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नेमण्यात आले. तसेच, एक शिक्षिका आजारी पडल्याने त्या शाळेत येत नव्हत्या. त्यामुळे त्यांची करी रोड येथील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बदली करण्यात आली.
शाळेत सातत्याने शिक्षकांची कमतरता असल्याने, तसेच कायमस्वरूपी शिक्षकांअभावी पासपोली शाळा क्र. २ जून २०२५ मध्ये बंद करून पासपोली शाळा क्रमांक १ मध्ये विलीन करण्यात आली. या ठिकाणी मराठी शाळा क्रमांक ३ देखील होती. मात्र, शिक्षकांअभावी २०१८ मध्ये ती शाळा बंद करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पासपोली शाळा क्रमांक १ मध्ये पासपोली मराठी शाळा क्रमांक. २ विलीन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडली.
नवीन प्रवेशासह एकूण ३५० विद्यार्थी आता शाळेत शिक्षण घेत आहेत. आरटीई नियमानुसार, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. तसेच, शाळेची पटसंख्या वाढल्याने वर्गात विद्यार्थ्यांसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, वर्गांचीही कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्ग देखील सुरू करणे शक्य नाही.
दरम्यान, बंद करण्यात आलेल्या पासपोली मनपा मराठी शाळा क्रमांक २ मध्ये आता इंग्रजी माध्यमाचे वर्ग घेण्यात येत असून तिथे आता इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, पासपोली क्रमांक २ शाळेला पूर्णवेळ कायमस्वरूपी शिक्षक देऊन शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.